आयपीएल २०२६ मध्ये आजचा (११ एप्रिल) पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात मुल्लणपूर येथे सुरू आहे. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरचा हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे पॉवरप्लेमध्ये दिसले. हैद्राबादचे सलामीवीर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी संघाला स्फोटक सुरूवात करून दिली.
अभिषेकने सुरूवातच चौकारने केली. त्याने नंतर अर्शदीप सिंगच्या एका षटकात २४ धावा वसूल केल्या. त्याने विजयकुमार वैशाक याच्या पहिल्याच षटकात चार षटकार मारले आणि १८ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. दुसरीकडे हेडनेही काही उत्तम शॉट्स खेळले. यामुळे हैद्राबादने पहिल्या सहा षटकातच शंभरचा टप्पा पार केला. यामुळे आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिकवेळा १०० पेक्षा अधिक धावा करणारा हैद्राबाद पहिला संघ ठरला आहे.
आयपीएलमध्ये १ ते ६ षटकांत १००+ धावा करणारे संघ-
१२५/०- एसआरएच विरुद्ध डिसी, दिल्ली, २०२४
१०७/० – एसआरएच विरुद्ध एलएसजी, हैद्राबाद, २०२४
१०५/० – एसआरएच विरुद्ध पीबीकेएस, मुल्लानपूर, २०२६
१०५/० – केकेआर विरुद्ध आरसीबी, बंगळुरू, २०१७
१००/२ – सीएसके विरुद्ध पीबीकेएस, मुंबई, २०१४
या सामन्यात अभिषेकनेही एका खास यादीत प्रवेश केला आहे. तो पंजाबविरुद्ध २८ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकाराच्या सहाय्याने ७८ धावा करत बाद झाला. याबरोबरच तो आयपीएलच्या एका डावात पॉवरप्लेमध्ये ७ षटकार मारणारा केवळ चौथाच फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी अशी कामगिरी २००८ मध्ये सनथ जयसूर्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध केली होती.
एका आयपीएल डावातील १-६ षटकांमध्ये सर्वाधिक षटकार
७ – सनथ जयसूर्या (एसआय) वि. सीएसके, मुंबई वानखेडे स्टेडियम, २००८
७ – जोस बटलर (आरआर) वि. डीसी, दिल्ली, २०१८ (पावसामुळे संक्षिप्त झालेला सामना)
७ – जॉनी बेअरस्टो (पीबीकेएस) वि. आरसीबी, ब्रेबॉर्न, २०२२
७ – अभिषेक शर्मा (एसआरएच) वि. पीबीकेएस, मुल्लानपूर, २०२६






