आयपीएल 2024 चे साखळी सामने संपले आहेत. कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू हे चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले. क्वालिफायर 1 मध्ये कोलकाता विरुद्ध हैदराबाद लढत होईल, तर राजस्थान आणि बंगळुरू एलिमिनेटरमध्ये भिडतील. क्वालिफायर 1 जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळेल, तर पराभूत संघाचा सामना एलिमिनेटर जिंकणाऱ्या संघाशी होईल. यांच्यातील विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.
लीग टप्पा संपल्यानंतर आता आगामी टी20 विश्वचषकात निवड झालेल्या भारतीय खेळाडूंची या हंगामात कामगिरी कशी राहिली, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चला तर मग, विश्वचषकात निवड झालेल्या भारताच्या सर्व 15 खेळाडूंच्या आयपीएल लीग टप्प्यातील कामगिरीवर एक नजर टाकूया.
रोहित शर्मा (कर्णधार) – टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं आयपीएल 2024 च्या 14 सामन्यांमध्ये 32 ची सरासरी आणि 150 च्या स्ट्राइक रेटनं 417 धावा केल्या. ‘हिटमॅन’चा हंगाम चढ-उतारांनी भरलेला होता. मात्र लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात त्यानं लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 38 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी करून फार्ममध्ये परतण्याचे संकेत दिले.
यशस्वी जयस्वाल – रोहित शर्माचा सहकारी सलामीवीर यशस्वी जयस्वाल याचाही हा हंगाम संमिश्र राहिला. यशस्वीनं आयपीएल 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या 14 सामन्यांमध्ये 348 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. यशस्वीची राजस्थान रॉयल्स टीम प्लेऑफमध्ये पोहचली असल्यानं त्याला आपली चुणूक दाखवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
विराट कोहली – आयपीएल 2024 च्या लीग स्टेजमध्ये विराट कोहलीच्या बॅटनं खूपच कहर केला. कोहलीनं 155 चा स्ट्राईक रेट आणि 64 च्या सरासरीनं 708 धावा ठोकल्या. लीग स्टेजमध्ये कोहली हा एकमेव फलंदाज होता, ज्यानं 700 धावांचा टप्पा ओलांडला. आश्चर्याचं म्हणजे, इतर कोणत्याही फलंदाजाला आतापर्यंत 600 धावांचा टप्पाही पार करता आलेला नाही. कोहलीनं या हंगामात एक शतक आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत.
सूर्यकुमार यादव – जगातील नंबर 1 टी20 फलंदाजासाठी आयपीएल 2024 चा हंगाम चांगला राहिला. सूर्या दुखापतीमुळे सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नाही, मात्र कमबॅक केल्यानंतर त्यानं 11 सामन्यात 345 धावा ठोकल्या. यामध्ये एका धडाकेबाज शतकाचाही समावेश आहे. मात्र, या दरम्यान तो तीन वेळा खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला, हेही विशेष.
रिषभ पंत (यष्टीरक्षक) – भीषण कार अपघातानंतर मैदानात परतलेल्या रिषभ पंतसाठी हा हंगाम चांगला राहिला. साखळी टप्प्यात खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये त्यानं 446 धावा केल्या. बंदीमुळे पंत आरसीबीविरुद्धचा सामना खेळू शकला नाही. स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयनं त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली होती.
संजू सॅमसन (यष्टीरक्षक) – राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसाठी आयपीएल 2024 चा हंगाम विक्रमी राहिला. सॅमसननं लीग टप्प्यातील 14 सामन्यांमध्ये 156 च्या स्ट्राइक रेटनं 504 धावा ठोकल्या. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हा सर्वोत्तम हंगाम आहे. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये सॅमसन आणि त्याच्या संघानं आपली लय गमावली आहे.
हार्दिक पांड्या (उपकर्णधार) – भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्यासाठी आयपीएल 2024 चा हंगाम फारच खराब राहिला. तो ना कर्णधार म्हणून किंवा ना फलंदाज म्हणूनही प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरला. त्याच्या नेतृत्वात मुंबईचा संघ 14 पैकी 10 सामने गमावून गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर राहिला. हार्दिकनं या मोसमात 14 सामन्यांत केवळ 216 धावा केल्या असून यादरम्यान त्यानं केवळ 11 विकेट घेतल्या.
शिवम दुबे – चेन्नईच्या या डावखुऱ्या स्फोटक फलंदाजानं आयपीएल 2024 मध्ये एकूण 396 धावा केल्या. मोसमाचा पूर्वार्ध त्याच्यासाठी उत्कृष्ट राहिला, ज्याच्या जोरावर तो टी20 विश्वचषकात स्थान मिळवू शकला. परंतु संघात निवड झाल्यानंतर त्याला एकही मोठी खेळी खेळता आली नाही.
रवींद्र जडेजा – या स्टार डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूचाही हंगाम चांगला गेला नाही. जड्डूनं आयपीएल 2024 मध्ये केवळ 267 धावा केल्या. या दरम्यान त्यानं 8 विकेट घेतल्या. आयपीएलमधील त्याच्या निराशाजनक कामगिरीनंतर टी20 विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
अक्षर पटेल – दिल्लीच्या या डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूनं आयपीएल 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या 14 सामन्यांमध्ये 235 धावा केल्या आणि 11 बळी घेतले.
कुलदीप यादव – या चायनामन गोलंदाजानं आयपीएल 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या 11 सामन्यांमध्ये 16 विकेट घेतल्या. टी20 विश्वचषकात भारतीय संघात कुलदीपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
युझवेंद्र चहल – शिवम दुबेप्रमाणेच युझवेंद्र चहलनंही लीग स्टेजच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली, परंतु निवड झाल्यानंतर चहलचा फॉर्म गायब झाला. त्यानं 13 सामन्यांत 17 बळी घेतले आहेत. आता चहल प्लेऑफमध्ये आपली गेलेली लय पुन्हा मिळवेल अशी आशा आहे.
जसप्रीत बुमराह – मुंबई इंडियन्सच्या या वेगवान गोलंदाजानं आयपीएल 2024 मध्ये 20 विकेट घेत कहर केला. हंगामाच्या शेवटच्या सामन्यात मुंबईनं त्याला विश्रांती दिली होती. जर बूम-बूमला हा सामना खेळण्याची संधी मिळाली असती, तर कदाचित त्यानं ‘पर्पल कॅप’ही मिळवली असती.
मोहम्मद सिराज – या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजासाठी आयपीएल 2024 चा हा हंगाम फारसा खास राहिला नाही. साखळी टप्प्यात खेळल्या गेलेल्या 13 सामन्यांमध्ये सिराजनं केवळ 13 विकेट्स घेतल्या आहेत. आता आशा आहे की सिराज प्लेऑफमध्ये फॉर्ममध्ये परतेल.
अर्शदीप सिंग – भारताच्या टी20 विश्वचषक संघातील एकमेव डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं 19 विकेट्ससह लीग स्टेजचा शेवट केला. आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराहसह तो टॉप-5 मध्ये राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
ठरलं! एलिमिनेटर सामन्यात आरसीबीशी भिडणार हा संघ, क्वालीफायर 1 मध्ये या दोन संघांत लढत
17 वर्षांत असं प्रथमच घडलं! आयपीएलमध्ये पंजाब किंग्जनं रचला अनोखा इतिहास; जाणून घ्या
आधी सलग 6 पराभव…मग सलग 6 विजय! आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कमबॅकचे हे आहेत 5 शिल्पकार