---Advertisement---

रांची येथे होणारा दुसरा टी२० सामना होणार रद्द? प्रकरण पोहचले न्यायालयात

On: गुरूवार, नोव्हेंबर 18, 2021 11:09 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात न्यूझीलंडवर पाच गडी राखून विजय मिळवला. आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रांची येथे होणाऱ्या भारत-न्यूझीलंड टी२० क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना पुढे ढकलण्यात यावा किंवा स्टेडियमच्या निम्म्या क्षमतेचे सामने खेळवण्याची परवानगी द्यावी यासाठी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

झारखंड उच्च न्यायालयाचे अधिवक्ता धीरज कुमार यांनी झारखंड राज्य क्रिकेट संघटनेच्या जेएससीए स्टेडियमवर न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यात प्रेक्षकांसाठी १०० टक्के जागा प्रेक्षकांसाठी खुल्या करण्याच्या विरोधात झारखंड उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. धीरज कुमार यांनी १०० टक्के क्षमतेने क्रिकेट सामने आयोजित करण्यास सूट देण्यास विरोध केला आहे. ते म्हणाले की, राज्याची मंदिरे, सर्व न्यायालये आणि इतर कार्यालयेही कोरोना संसर्गाबाबत ५० टक्के कर्मचाऱ्यांसह काम करत असताना, १०० टक्के क्षमतेचे क्रिकेट स्टेडियम वापरण्यास राज्य सरकारने कोणत्या नियमानुसार परवानगी दिली आहे?

याचिकेत शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) सामना पुढे ढकलण्याची किंवा शंभर टक्के क्षमतेच्या स्टेडियमच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी व्हावी आणि या प्रकरणातील राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी वकिलांनी न्यायालयात विशेष विनंतीही केली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी, राज्य सरकारने न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील क्रिकेट सामन्यासाठी स्टेडियमच्या केवळ ५० टक्के जागा बुक करण्याची परवानगी दिली होती, परंतु नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आणि आयोजकांना सामन्यासाठी स्टेडियमधील सर्व जागा बुक करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

यापूर्वी झारखंड सरकारने रांची येथे होणाऱ्या टी२० सामन्यासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावले होते. रांचीच्या जेएससीए क्रिकेट स्टेडियममध्ये १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० सामना पाहण्यासाठी चाहत्यांना कोविड लसीकरण प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. तसेच स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी, प्रेक्षकांना १५ नोव्हेंबरनंतरचे ‘आरटीपीसीआर’ किंवा ‘कोविड लसीचे दोन्ही डोस’ या अहवालांचा पुरावा दाखवावा लागणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---