मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बाद करणे हे कोणत्याही युवा गोलंदाजासाठी स्वप्नासारखे आहे. सचिनच्या विरुद्ध शेन वॉर्न, शोएब अख्तर, ग्लेम मॅकग्रा, ब्रेट ली, यांसारखे दिग्गज गोलंदाजही अनेकदा अपयशी ठरले आहेत. पण 2005 ला झालेल्या चॅलेंजर्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 16 वर्षीय पियुष चावलाने सचिनला बाद केले होते.
त्यावेळी भारत ब संघाचा भारतीय वरिष्ठ संघाविरुद्ध (India Seniors team) चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामना मोहाली येथे होत होता. भारतीय वरिष्ठ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
यावेळी दिनेश मुंगीया कर्णधार असलेला भारत ब संघ 177 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय वरिष्ठ संघाकडून उतरलेल्या सचिनला 7 व्या षटकात चावलाने 22 धावांवर त्रिफळाचीत केले होते.
या विकेटची आठवण अरुण वेणूगोपाल यांच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना चावलाने सांगितली आहे. तो म्हणाला, ‘पार्थिव पटेल या विकेटच्या मागे होते. दिनेश मोंगिया कर्णधार होता. जेव्हा आपण 15-16 वर्षांचे असता आणि सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करत असता तेव्हा एकतर तुम्ही चिंताग्रस्त असता किंवा रिलॅक्स असता. सुदैवाने सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करताना मी रिलॅक्स होतो.’
‘जरी सचिन पाजीने माझे चेंडूवर मोठे फटके मारले असते, तरी काही फरक पडला असता का? जर सचिन पाजी शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन आणि ग्लेन मॅकग्रा सारख्या गोलंदाजांना फटकावतो तर त्याने माझ्या गोलंदाजीवर मोठे फटके मारणे ही मोठी गोष्ट नव्हती. त्यामुळे त्यावेळी माझ्याकडे हरण्यासारखे काही नव्हते. मी फक्त सचिन पाजीला गोलंदाजी करण्याच्या क्षणाचा आनंद घेत होतो.’
चावला पुढे म्हणाला, ‘जेव्हा रन-अप घेतो तेव्हा एक गोलंदाज म्हणून आपल्याला खरोखर काय गोलंदाजी करायची आहे याचा विचार करावा लागतो. अशा परिस्थितीत नेमके काय घडले हे मला ठाऊक नाही. जेव्हा मी माझ्या रन-अपला सुरुवात केली तेव्हा मला वाटले की मी लेग स्टंपपासून लेगस्पिन गोलंदाजी करेन ज्यामुळे चेंडू त्याच्यापासून दूर जाईल. पण प्रामाणिकपणे मला अजूनही माहित नाही. आता जवळजवळ 16 वर्षे झाली आहेत. माझ्या मनात काय आले हे मला माहित नाही.’
विशेष म्हणजे त्यानंतर 1 वर्षाने चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये पुन्हा सचिन आणि चावला आमने-सामने आले तेव्हा सचिनने चावलाच्या 1 षटकात 20 धावा काढल्या होत्या.
याबद्दल चावला म्हणाला, ‘लोकांना वाटले की मी मागील वेळेप्रमाणे सचिन पाजीची विकेट घेईन. पण सचिन पाजी गोष्टी पटकन विसरणारी व्यक्ती नाही. पुढच्याच वर्षी चेन्नईमधील झालेल्या सामन्यात पाजीने माझ्या पहिल्या षटकात सुमारे 20 धावा फटकावल्या. हेच मी म्हणत होतो की जर पाजीनी माझ्या गोलंदाजीवर मोठे फटके मारले तरी ही मोठी गोष्ट नाही. पाजींनी बर्याच गोलंदाजांना फटकावले आहे.’
ट्रेंडिंग घडामोडी –
श्रीसंत म्हणतो, ही ट्रॉफी जिंकली की मी धोनीला खांद्यावर घेऊन मारणार मैदानाला फेरी
‘या’ भारतीय माजी क्रिकेटरची जाऊ शकते नोकरी, बीसीसीआयने सांगितले कारण
लॉकडाऊनमुळे बदलणार टीम इंडियाची जर्सी, १४ वर्षात पहिल्यांदाच होणार ही नकोशी गोष्ट