आयपीएल २०२०चे आयोजन यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान होत आहे. केवळ तिसऱ्यांदा आयपीएलचे सामने परदेशात होणार आहेत. यापुर्वी दक्षिण आफ्रिका व संयुक्त अरब अमिरातीमध्येच आयपीएलचे आयोजन झाले आहे. हा आयपीएलचा १३वा हंगाम असणार आहे. शिवाय हा हंगान अनेक कारणांनी विशेष ठरणार आहे.
यावर्षीच्या आयपीएलमध्ये एक खास गोष्ट पहायला मिळेल ती म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार व आयपीएलमधील रॉयल चॅलेंज बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली १३व्या हंगामातही त्याच संघाकडून खेळताना दिसेल, ज्या संघाकडून त्याने पहिला हंगाम खेळला होता.
आयपीएलमध्ये आत्तापर्यंतच्या सर्व हंगामात (१२ हंगामात) खेळलेल्या खेळाडूंनी एकदातरी संघ बदलले आहेत. पण याला अपवाद ठरला तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीचा.
विराट आयपीएलमध्ये सर्व हंगामात एकाच संघाकडून खेळणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. याआधी एमएस धोनी, सुरेश रैना हे सुद्धा चेन्नई सुपर किंग्स या एकाच संघाकडून खेळणारे खेळाडू होते, परंतु २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांसाठी या संघावर बंदी आल्याने या दोन्ही खेळाडूंना संघ बदलावा लागला होता. त्यानंतर २०१८च्या हंगामात ते पुन्हा आपला मुळ संघ चेन्नईकडून खेळू लागले.
विराटला २००८ साली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने संघात समाविष्ट करून घेतले होते. विशेष म्हणजे याच वर्षी विराटच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. तसेच त्याने याच वर्षी भारतीय संघातही पदार्पणही झाले होते.
त्याच्या चांगल्या कामगिरीच्या चढत्या आलेखामुळे तो कधीही बंगलोर संघातून बाहेर गेला नाही. तसेच काही वर्षातच त्याला बंगलोर संघाचे कर्णधारपदही मिळाले. त्याने २०१३ साली बंगलोर संघाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. या हंगामातही बेंलगोरच्या नेतृत्त्वाची धुरा विराटकडेच राहणार आहे.