इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19व्या हंगामात खेळाडूंकडून वारंवार होणाऱ्या प्रोटोकॉलच्या उल्लंघनामुळे बीसीसीआयने 8 पानांची नवीन नियमावली सर्व फ्रँचायझींसाठी जारी केली आहे. या वादाच्या केंद्रस्थानी ‘व्हेपिंग’ म्हणजेच ई-सिगरेटचे सेवन असल्याचे मानले जात आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग (Riyan Parag) ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगरेट ओढतानाचा व्हिडिओ समोर आला होता, ज्यावर BCCI ने कारवाई केली होती. पंजाब किंग्सचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल (Yujvendra chahal) याचा विमानात ‘व्हेप’ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अर्शदीप सिंगच्या पॉडकास्टशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ खरा आहे की त्यामध्ये काही फेरफार (Editing) करण्यात आली आहे, याची अद्याप BCCI किंवा कोणत्याही अधिकृत संस्थेकडून पुष्टी झालेली नाही.
माजी भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली कडक प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी म्हटले की, जर देशात ‘व्हेप’वर बंदी असेल, तर असा गुन्हा करणाऱ्यांना तुरुंगात टाकले पाहिजे. कायदा केवळ बनवण्यासाठी नसून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी असतो. या प्रकरणात केवळ 25 टक्के दंड आकारणे ही खूप किरकोळ शिक्षा आहे. जर सामान्य माणसाने असे केले असते, तर त्याच्यावर कडक कारवाई झाली असती.
बीसीसीआयने जारी केलेल्या 8 पानांच्या नवीन नियमावलीत ई-सिगरेटबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. टीम ड्रेसिंग रूम, सराव क्षेत्र (Practice Area) आणि टीम हॉटेलमध्ये ई-सिगरेट आणि सर्व प्रतिबंधित पदार्थांवर पूर्णपणे बंदी असेल. जर कोणताही खेळाडू या नियमांचे उल्लंघन करताना आढळला, तर त्याच्यावर बोर्डाकडून कठोर कारवाई केली जाईल.






