आयपीएल २०२६ चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी विसरण्यासारखाच ठरला आहे. बुधवारी (२० मे) ईडन गार्डन्सवर त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. यामध्येही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर एमआयचा कर्णधार हार्दिक पांड्याला गुरूवारी (२१ मे) एक मोठा धक्का बसला. त्याला आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल मोठा दंडही ठोठावण्यात आला आहे.
आयपीएलच्या अधिकृत निवेदनानुसार, त्याने क्रिकेटच्या उपकरणांचा आणि मैदानातील साधनांचा गैरवापर करण्यासंदर्भात आचारसंहितेच्या स्तर १ चे उल्लंघन केले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे, हार्दिक पांड्याने आयपीएलच्या आचारसंहितेतील कलम २.२ चे उल्लंघन केल्याचे आढळले आहे, जे सामन्यादरम्यान क्रिकेटचे साहित्य किंवा कपडे, मैदानातील उपकरणे किंवा वस्तूंचा गैरवापर करण्याशी संबंधित आहे.
वरील नियमांचे उल्लंघन केल्याने हार्दिकला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला असून, त्याच्या खात्यावर एक ‘डिमेरिट पॉइंट’ जमा करण्यात आला आहे. ही घटना केकेआरच्या धावांचा पाठलाग करताना १० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर घडली, जेव्हा हार्दिक खेळपट्टीवर परत जात असताना त्याने जोरात स्टम्प्सवरील बेल्स पाडल्या.
हार्दिकने गुन्हा कबूल केला आणि सामनाधिकारी राजीव सेठ यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली. नियमानुसार, आयपीएलमध्ये चार ते सात डिमेरिट पॉइंट्स जमा झाल्यास एका सामन्याची बंदी येऊ शकते.
सामन्याची स्थिती पाहिली तर, एमआयसाठी आणखी एक निराशाजनक सामना ठरला. तसे ते आधीच प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर झाले आहेत. यावेळी केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या एमआयची सुरूवात अडखळत झाली. रायन रिकल्टन ६ धावा, रोहित शर्मा १५ धावा आणि नमन धीर शून्यावरच तंबूत परतला. एमआयकडून सर्वाधिक धावा आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कॉर्बिन बॉशने केल्या. त्याने १८ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ३२ धावा केल्या. बाकी फलंदाजांनी निराशा केल्याने एमआयने २० षटकांत ८ विकेट्स गमावत १४७ धावसंख्या उभारली.
प्रत्युत्तरात केकेआरकडून या हंगामात पहिल्यांदाच फलंदाजीची संधी मिळालेल्या मनीष पांडेने दमदार खेळी केली. त्याला रोवमन पॉवेलने चांगली साथ दिली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६४ धावांची (४७) खेळी केली. पॉवेलने ४० धावा तर मनीषने ३३ चेंडूंत ४५ धावा केल्या. दोघांच्या या अप्रतिम खेळीमुळे केकेआरने १८.५ षटकांत ६ विकेट्स गमावत लक्ष्य गाठले. तसेच मनीष सामनावीर ठरला. केकेआरने हा सामना जिंकल्याने त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत आहेत.






