क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ फीटनेस चांगली असेल तेव्हाच तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. याउलट जर तुमची फीटनेस चांगली नसेल, तर तुम्हाला कोणत्याच खेळामध्ये चांगली कामगिरी करता येणार नाही. तसेच सक्रियदेखील राहता येणार नाही.
आता जर क्रिकेटबद्दल चर्चा करायची म्हटलं, तर जगभरातून पसंती मिळणाऱ्या क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना पाहून असे म्हणणे चूकीचे ठरणार नाही की त्यांची चपळता बिबट्याप्रमाणे आहे. तसेच असेही काही खेळाडूदेखील आहेत, जे आवश्यकतेपेक्षा अधिक आळशी आहेत. अशाच क्रिकेटविश्वातील सर्वात आळशी क्रिकेटपटूंचा एक क्रिकेट संघ तयार होऊ शकतो. या लेखात, आम्ही आळशी क्रिकेटपटूंची प्लेइंग इलेव्हन तयार केली आहे. चला तर मग एकदा नजर टाकूया, या आगळ्यावेगळ्या संघावर…
१) रोहित शर्मा : भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये तो असा एकमेव खेळाडू आहे, ज्याच्या नावे ३ द्विशतके आहेत. परंतु अनेकदा त्याच्या फलंदाजी शैलीला ‘लेजी एलिगंस’ म्हटले गेले आहे. काही दिवस त्याने सराव करणे सोडून दिले; तर त्याचे पोट दिसायला सुरुवात होते. त्यामुळे त्याला या यादीत सलामी फलंदाजाची भूमिका देण्यात आली आहे.
२) मोहम्मद शहजाद : या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे अफगाणिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद शहजाद. त्याला आता संघात खेळण्याची संधी मिळत नसली तरीही त्याने अफगाणिस्तान संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध शतक देखील झळकावले आहे. त्याची फलंदाजी कितीही आक्रमक असली तरीदेखील तो आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. वजनदार शरिरामुळे त्याने अनेकदा यष्टीमागे झेल सोडले आहेत.
३) ख्रिस गेल : वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याची वेगळी ओळख करून देण्याची काहीच आवश्यकता नाही. ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या खेळाडूने जगभरात आपल्या फलंदाजीचा डंका वाजवला आहे. चौकार षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या या खेळाडूला आपण अनेकदा पहिले असेल की, तो २ धावा घेण्यासाठी सहसा धावत नाही. तो एक धाव घेऊन संतुष्ट असतो. ४१ वर्षीय गेलला पाहून अजूनही गोलंदाजांना घाम फुटतो. परंतु त्याची खेळट्टीवर धावण्याची गती पाहून त्याला या संघात स्थान देण्यात आले आहे.
४) सौम्य सरकार : बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू सौम्य सरकार हा फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही करू शकतो. त्याने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला सौम्य सरकारवर अनेकदा क्षेत्ररक्षणामुळे टीका केली गेली आहे. तो अवघ्या २८ वर्षांचा आहे. तरीदेखील मैदानावर खेळताना त्याचा आळशीपणा दिसून येत असतो. त्यामुळे त्याला या यादीत स्थान देण्यात आले आहे.
५) हॅरिस सोहेल : पाकिस्तान संघातील फलंदाज हॅरिस सोहेल तसा विश्वसनीय फलंदाज आहे. परंतु तो आपल्या क्षेत्ररक्षणामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याने क्षेत्ररक्षण करताना अनेकदा सोपे झेल सोडले आहेत. तसेच फलंदाजी करताना खेळपट्टीवर देखील त्याचा आळशीपणा दिसून येत असतो. त्याने आपल्या फिटनेसवर जोर दिला तर तो अनेक वर्षे पाकिस्तान संघासाठी खेळू शकतो.
६) सरफराज अहमद : पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद हा या संघात यष्टीरक्षकाची भूमिका पार पडणार आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याला अनेकदा ट्रोल केले गेले आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत त्याचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो आळस देत होता. त्याला पाहून कोणी म्हणणार नाही की, हा पाकिस्तान संघाचा कर्णधार होता. आता पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम आहे. तर सरफराज अहमदला संघात खेळण्याची देखील संधी मिळत नाहीये.
७) सुनील नरेन : आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना अडचणीत टाकणाऱ्या सुनील नरेनवर अनेकदा टीका गेली आहे की, तो मैदानात खूप धिमा आहे. तसेच तो सोपे झेलदेखील सोडतो. तो अतिशय हळूवार खेळत असल्यामुळे त्याला नेहमी फाईन लेग किंवा थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करण्याची जबाबदारी दिली जाते. या यादीत त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.
८) कुलदीप यादव : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने भारतीय संघाला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला संघात स्थान मिळवणेही कठीण जात आहे. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांची जोडी एकेकाळी सुपरहिट झाली होती. त्याची गोलंदाजी जरी चांगली असली तरीही क्षेत्ररक्षण करताना तो स्लो दिसून आला आहे. जेव्हापासून विराट कोहलीने संघाचे नेतृत्वापद स्विकारले आहे. तेव्हापासून त्याने खेळाडूंच्या फिटनेसवर थोडाफार जोर दिला आहे.
९) तबरेज शम्सी : दक्षिण आफ्रिकन संघाचा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सी हा आपल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने जगभरातील अनेक टी-२० लीग खेळल्या आहेत. एक गोलंदाज असल्यामुळे त्याच्या खेळपट्टीवर धाव घेण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात नाही. परंतु तो क्षेत्ररक्षण करत असताना अनेक झेल सोडतो, ज्यामुळे अनेकदा त्याच्यावर टीका केली जाते.
१०) लसिथ मलिंगा : श्रीलंकन संघाचा वेगवान गोलंदाज,लसिथ मलिंगा हा सध्या श्रीलंका संघासाठी खेळताना दिसून येत नाहीये. मलिंगाने देखील जगभरातील अनेक टी-२० लीग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. जलद गोलंदाज असल्यामुळे नेहमी त्याची फिटनेसची समस्या असायची. धारदार गोलंदाजी आणि वेगवान यॉर्कर चेंडूसाठी प्रसिद्ध असलेल्या मलिंगाने अनेक झेल सोडले आहेत.
११) मोहम्मद इरफान : पाकिस्तान संघाचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान या संघात ११ व्या खेळाडूचे स्थान मिळवू शकतो. त्याच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर तो १४० च्या गतीने गोलंदाजी करतो. ७ फूट १ इंच उंचीचा हा खेळाडू ‘द ग्रेट खली’ पेक्षा काही कमी नाही. उंची जास्त असल्यामुळे त्याला खाली वाकायला त्रास होतो, ज्याचा परिणाम त्याच्या क्षेत्ररक्षणावर दिसून येत असतो. त्याने शेवटचा सामना २०१९ मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला पाकिस्तान संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
‘उनाडकटचे पुनरागमन दूरच, त्याला शेवटच्या ३० खेळाडूंमध्ये जागा मिळणार नाही,’ माजी प्रशिक्षकाचा दावा
वाढदिवस विशेष! बॉलिवूडच्या ‘किंग खान’च्या नावावर आपले नाव ठेवणारा शाहरुख खान
एकेकाळचा भारतीय संघाचा ‘पोस्टर बाॅय’ ते सतत चर्चेत राहणारा टीम इंडियाचा प्रशिक्षक






