आईपीएलमध्ये 27 सप्टेंबर रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानचा अष्टपैलू राहुल तेवतिया विजयाचा नायक ठरला. त्याने पंजाबचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल याच्या एकाच षटकात 5 षटकार ठोकले आणि सामन्याचे चित्रच पालटले. सुरुवातीला 23 चेंडूत 17 धावा केल्यानंतर मोठे फटके खेळत त्याने 31 चेंडूत 53 धावांची खेळी केली
राहुल देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणातर्फे खेळतो. हरियाणा संघात असे काही खेळाडू आहेत, जे भारतीय क्रिकेट संघातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत. या खेळाडूंकडून आपण बरेच काही शिकलो, असे राहुल म्हणाला.
बुधवारी (30 सप्टेंबर) होणाऱ्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल म्हणाला, “मी हरियाणाकडून खेळतो आणि 2013-14 मध्ये रणजी सामन्यात पदार्पण केले. मी हरियाणातील लाहली स्टेडियममध्ये सामने खेळलो आहे. तेथील खेळपट्टी मध्यम वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे. आमच्या संघात भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले तीन फिरकीपटू आहेत. त्यांनी मला खूप मदत केली. युझवेंद्र चहल हा भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फिरकीपटू आहे, तर अमित मिश्रा आणि जयंत यादव हेदेखील भारताकडून खेळले आहेत.”
पंजाब विरुद्ध खेळलेल्या खेळीबद्दल तो म्हणाला, “जेव्हा मी फटके खेळू शकत नव्हतो तेव्हा माझ्यावर दबाव होता, परंतु संजू सॅमसनने मला सांगितले की मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे त्यानंतर मी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करीत होतो.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “दबावाच्या परिस्थितीत असे प्रदर्शन करण्यासाठी मानसिक ध्यैर्य लागते असे कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी मला सांगितले. त्यांना माझ्या क्षमतेवर नेहमी विश्वास होता. पंजाबविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण बदलले आहे.”