आयपीएल २०२१ हंगामातील नववा सामना शनिवारी (१७ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने हंगामातील दुसरा विजय संपादन करत दोन अंक मिळवले. या सामन्यात मुंबईचा उपकर्णधार कायरन पोलार्डने नवा विक्रम आपल्या नावे केला.
पोलार्डचा मोठा पराक्रम
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पोलार्ड पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याने संथ गतीने सुरुवात केली. मात्र, हळूहळू त्याच्या डावाने गती पकडली. भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या मुंबईच्या डावातील अखेरच्या दोन चेंडूंवर पोलार्डने दोन उत्तुंग षटकार ठोकत संघाला १५० धावांपर्यंत मजल मारून दिली. त्याने, २२ चेंडूत १ चौकार व ३ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ३५ धावा बनविल्या.
अशी कामगिरी करणारा तिसरा विदेशी बनला पोलार्ड
या सामन्यात आपल्या खेळीदरम्यान दुसरा षटकार मारताच कायरन पोलार्डने एका खास विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये ख्रिस गेल व एबी डिव्हिलियर्स यांच्यानंतर २०० षटकार मारणारा तो केवळ तिसरा विदेशी फलंदाज बनला. आता पोलार्डच्या नावे १६७ सामन्यात २०१ षटकार झाले. पहिल्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस गेलने २००८ पासून आजपर्यंत आयपीएलमध्ये १३४ सामने खेळताना ३५१ षटकार खेचले. एबी डिव्हिलियर्सने देखील आपल्या आयपीएल कारकिर्दीत आत्तापर्यंत १७१ सामने खेळताना २३७ षटकार ठोकले आहेत.
हैदराबादचा सलग तिसरा पराभव
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकात ५ गडी गमावून १५० अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. मुंबईसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ४० धावा बनविल्या. तर, रोहित शर्माने ३२ व कायरन पोलार्डने नाबाद ३५ धावांचे योगदान दिले. हैदराबादसाठी विजय शंकर व मुजीब उर रहमानने प्रत्येकी दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, स्पर्धेत प्रथमच सलामीला उतरलेल्या जॉनी बेअरस्टोने हैदराबादला तुफानी सुरुवात करुन दिली. त्याने २२ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ४३ धावा फटकावल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नर ३५ धावा काढून धावबाद झाला. त्यानंतर मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना हा दबाव झेपला नाही. हैदराबादचा संघ १९.४ षटकात १३७ धावांवर सर्वबाद झाला आणि हैदराबादला स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! हैद्राबादचा ‘हा’ खेळाडू तब्बल ६२ सामन्यात एकदाही झाला नाहिये शून्यावर बाद
दोन सामन्यात रोहित बाद होण्यामागे आहे विराटचा हात, वाचा सविस्तर