---Advertisement---

विंडीजचे प्रशिक्षक म्हणतात, मुंबई टी२० सामन्यात ही गोष्ट आमच्यासाठी फायद्याची

On: बुधवार, डिसेंबर 11, 2019 12:44 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात 3 सामन्यांच्या टी20 (3 Matches T20 Series) मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना बुधवारी (11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे पार पडणार आहे. भारत आणि विंडीजने मालिकेतील प्रत्येकी 1 सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

बुधवारी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी विंडीज संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स (Phil Simmons) यांनी मंगळवारी सांगितले की, वानखेडे स्टेडियमवर कायरन पोलार्डने (Kieron Pollard) आयपीएलचे बरेच सामने खेळले आहेत. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात विंडीजला पोलार्डचा अनुभव उपयोगी पडेल.

सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सिमन्स म्हणाले की, “पोलार्डने या मैदानावर बरेच क्रिकेट खेळले आहे. त्याच्या तुलनेत इतर खेळाडूंनी इतके सामने खेळले नाहीत. मला वाटते की पोलार्डचा दहा वर्षांचा अनुभव उपयुक्त ठरेल,” असे सिमन्स म्हणाले.

“इथल्या परिस्थितीबद्दल त्याला चांगली माहिती आहे. ज्यामुळे गोलंदाजांना मदत होईल. या क्रिकेट प्रकारात, संघात असे अनेक युवा खेळाडू आहेत, ज्यांना त्याचा अनुभव खूप उपयुक्त ठरेल,” असेही सिमन्स म्हणाले.

दोन्ही संघांनी मालिकेत अनेक झेल सोडले आहेत. त्यामुळे सिमन्स यांनी असेही म्हटले आहे की क्षेत्ररक्षणात बेजबाबदार होऊन चालणार नाही.

“झेल सोडून सामने जिंकले जात नाहीत. मला कारणे सांगितलेली आवडत नाही. तुम्ही झेल सोडले असतील तर ती तुमची चूक आहे. तूम्ही लाईट्सचे कारण देऊ शकत नाही” असे सिमन्स म्हणाले.

पोलार्डची वनडे संघात जेसन होल्डर (Jason Holder) आणि टी20 संघात कार्लोस ब्रेथवेटऐवजी (Carlos Brathwaite) कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

याबद्दल सिमन्स म्हणाले की, पोलार्ड दोन्हीही भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडत आहे.

वेस्ट इंडीजने 2016च्या टी20 विश्वचषकात उपांत्य सामन्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावरच भारताला पराभूत केले होते. पण सिमन्स म्हणाले की ही भूतकाळातील गोष्ट होती.

“त्यानंतर बरेच काही घडले आहे. परंतु दोन्ही सामन्यांमधील कामगिरी चांगली राहिल्याने आमचा संघ आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. संघाची तयारी व कामगिरीने माझा आत्मविश्वास वाढला आहे,” असेही सिमन्स म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---