भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात न्यूझीलंडवर पाच गडी राखून विजय मिळवला. आता, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेतील दुसरा सामना रांची येथे खेळवला जाणार आहे.
भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी आहे. त्यामुळे, ही मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करेल, तर न्यूझीलंड संघाला मालिकेत पुनरागमन करण्याची संधी असेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत १८ टी२० सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये ९ सामने न्यूझीलंड संघाने जिंकले आहेत, तर ७ सामन्यात भारताने विजय मिळवला असून दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. भारतातील नोंदी पाहिल्या, तर आता दोन्ही संघ बरोबरीच्या मार्गावर आहेत, कारण खेळल्या गेलेल्या ६ सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी ३-३ सामने जिंकले आहेत.
रांची येथील टी२० सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंना विक्रम करण्याची संधी असेल. या सामन्यात कोणत्या खेळाडूंना विक्रम करण्याची संधी असेल ते जाणून घेऊ या.
१. रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५० षटकार पूर्ण करण्यासाठी फक्त २ षटकारांची गरज आहे. अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरणार आहे.
२. इशान किशनला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, तर तो टी२० क्रिकेटमध्ये ५० झेल पूर्ण करू शकतो. सध्या टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ४९ झेल आहेत.
३. न्यूझीलंडचा फलंदाज टीम सेफर्टला टी२० क्रिकेटमध्ये २५०० धावा पूर्ण करण्यासाठी १० धावांची गरज आहे.
४. मिचेल सँटनरकडे टी२० क्रिकेटमध्ये ५० षटकार पूर्ण करण्याची संधी असेल. त्याच्या नावे टी२० क्रिकेटमध्ये ४९ षटकार जमा आहेत.
५. अक्षर पटेल टी२० क्रिकेटमध्ये १५० बळी पूर्ण करू शकतो. हा टप्पा गाठण्यापासून तो फक्त आठ विकेट्स दूर आहे.
६. व्यंकटेश अय्यर टी२० क्रिकेटमध्ये ५० षटकार पूर्ण करण्यापासून फक्त पाच षटकार दूर आहे.
७. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहच्या ६६ विकेट्सचा विक्रम मागे टाकण्यासाठी युझवेंद्र चहलला फक्त ४ विकेट्सची गरज आहे. जसप्रीत बुमराह टी२० मध्ये भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
८. जर मार्टिन गप्टिलने या सामन्यात ११ धावा केल्या, तर विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत निघेल. विराटच्या नावे सध्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३२२७ धावा आहेत.
९. रांचीच्या मैदानावर भारताने आतापर्यंत २ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे विजयी मालिका चालू ठेवणे, भारतीय संघाचे प्राधान्य असेल.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, अवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड संघ: टीम साऊथी (कर्णधार), टॉड ऍस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, ऍडम मिलने, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टीम सेफर्ट, ईश सोढी.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० वर्ल्डकपमधील पराभवानंतर पाकिस्तानची नवीन सुरुवात, खेळाडूंच्या फोटोशूटचा व्हिडिओ व्हायरल
भज्जीचा नवा लूक! यष्टीरक्षण करताना अप्रतिम झेल घेताच हरभजनने केला भांगडा, व्हिडिओ व्हायरल