---Advertisement---

कर्नाटकच्या युवा गोलंदाजाचं चमकलं नशीब, इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्णासाठी सज्ज; ‘अशी’ राहिली कमागिरी

On: शुक्रवार, मार्च 19, 2021 12:54 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघादरम्यान अहमदाबाद येथे ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. हे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट असोशियशनच्या पुण्यातील स्टेडियमवर होणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने शुक्रवार रोजी (१९ मार्च) १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात काही नविन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यात कर्नाटकचा २५ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याचा समावेश आहे.

विजय हजारे ट्रॉफीतील प्रदर्शनाचे फळ
कृष्णाने विजय हजारे ट्रॉफी २०२१ मधील प्रदर्शनाने निवडकर्त्यांना प्रभावित केले आहे. या स्पर्धेत कर्नाटक संघाकडून खेळताना ७ सामन्यात २२.२च्या सरासरीने १४ विकेट्स घेतल्या आहेत. कर्नाटककडून या स्पर्धेत त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.

त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर कर्नाटक यावेळी विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहचला होती. उपांत्य फेरीत मात्र कर्नाटकला मुंबईकडून ७२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातही प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट्स घेतल्या होत्या.

याबरोबरच ४८ अ दर्जांच्या सामन्यात ५.१७ च्या इकोनॉमी रेटने त्याने ८१ विकेट्स चटकावल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३४ विकेट्सची नोंद आहे. ९ प्रथम श्रेणी सामन्यात खेळताना त्याने या विकेट्स घेतल्या आहेत. तर ४० ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ३३ विकेट्सची कामगिरी केली आहे.

बांगलादेश अ विरुद्धच्या कामगिरीने पहिल्यांदा आला चर्चेत
साल २०१५ मध्ये बांगलादेश अ संघ भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यातील कामगिरीने कृष्णा सर्वप्रथम चर्चेत आला होता. त्याने कर्नाटक विरुद्ध बांगलादेश अ यांच्यात झालेल्या सामन्यात ४९ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने आपल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सलामीवीर रॉनी तालुकदारला शून्यावर तंबूत धाडले होते. त्यानंतर अनामुल हक, सौम्‍य सरकार, नासिर हुसैन आणि कामरुल इस्लाम यांना आपल्या जाळ्यात फसवले होते.

याचवर्षी त्याला भारत अ संघात संधी मिळाली होती. याबरोबरच डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या एसीसी इमर्जिंग टीम आशिया चषकातही त्याला संधी मिळाली होती.

गाजवले आहे आयपीएलचे मैदान
एवढेच नव्हे तर, कृष्णाने जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगचेही मैदान गाजवले आहे. २०१८ पासून कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने आजवर २४ सामने खेळले आहेत. दरम्यान ९.३३ च्या इकोनॉमी रेटने १८ विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी ३० धावांवर ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

तपश्चर्या आली फळाला! टी२० नंतर सूर्यकुमारची वनडेत दिमाखात एन्ट्री, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

शेवटच्या षटकात २ वाइड आणि चौकार-षटकार, शार्दुलने सांगितले कुठे उद्भवली समस्या?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---