कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेले आहे. त्यामुळे त्याचा अनेक क्षेत्रांवर परिणाम होत आहे. यात क्रीडाक्षेत्राचाही समावेश आहे. अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा एकतर पुढे ढकलण्यात आल्या आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. यात आता भारतात होणाऱ्या प्रीमीयर बॅडमिंटन लीगचीही भर पडली आहे.
पीबीएलचा सहावा हंगाम डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान होणार होता. मात्र कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन हा हंगाम पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत पीबीएलच्या सोशल मीडिया अकांउंट्सवर माहिती देण्यात आली आहे. तसेच स्पोर्टझलिव्हचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद मांगीपुडी, जे या लीगचे अधिकृत होस्ट आहेत, त्यांनी या निर्णयाची पुष्टी केली आहे.
🎙️ Major Announcement#PBL has been postponed to 2021 🏸#RiseoftheRacquet pic.twitter.com/NhnQW2kJFO
— Premier Badminton League (@PBLIndiaLive) November 27, 2020
प्रसाद म्हणाले, ‘सर्वांचे आरोग्य व सुरक्षिततेला खूप महत्त्व आहे. सर्व मार्गदर्शक तत्त्वे, प्रोटोकॉल आणि वचनबद्धतेचा काळजीपूर्वक विचार करून आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाशी चर्चा केल्यानंतर आम्ही पुढील वर्षाच्या संभाव्य तारखा शोधण्याचा निर्णय घेतला आहे.’
पीबीएलचे आत्तापर्यंत ५ हंगाम झाले आहेत. या स्पर्धेत दरवर्षी ६ संघ भाग घेतात. तसेच या स्पर्धेत एकेरी आणि दुहेरी गटातील सामनेही होतात.