मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी (१८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात दिल्लीने पंजाबला ६ गडी राखून पराभूत केले. यासह दिल्लीने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. या सामन्यात दिल्लीचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने ३२ धावांची तुफानी खेळी करून चाहत्यांची मने जिंकली. सामन्यानंतर, पृथ्वी शॉने आपल्या कामगिरीचे श्रेय आपल्या तिन्ही प्रशिक्षकांना दिले.
या प्रशिक्षकांना दिले श्रेय
आयपीएलच्या सुरुवातीच्या तीन सामन्यात पृथ्वी शॉ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. त्याने आपल्या या फॉर्मविषयी खुलासे केले. पृथ्वी म्हणाला, “ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून संघाबाहेर झाल्यानंतर मी माझ्या तंत्रावर काम केले. स्वतःला मानसिकदृष्ट्या कणखर बनवलेय. ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर प्रशांत शेट्टी सर व प्रवीण आमरे सरांनी या काळात माझ्यावर मेहनत घेतली. आयपीएलसाठी ज्यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल झालो तेव्हा रिकी पॉंटिंग यांनी देखील मदत केली.”
ऑस्ट्रेलिया दौ-यानंतर दिसला फॉर्ममध्ये
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऍडलेड येथील पहिल्या कसोटीत पृथ्वी ० आणि ४ धावांवर बाद झाल्याने त्याला संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आहे त्याला संधी देण्यात आली नाही. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत त्याने १६५च्या सरासरीने ८२७ धावा बनविल्या होत्या. त्याच्याच नेतृत्वात मुंबईने ही स्पर्धा आपल्या नावे केली होती. आयपीएल २०२१ च्या पहिल्या सामन्यात त्याने दमदार अर्धशतक झळकावले होते.
दिल्लीचा दुसरा विजय
केएल राहुल (६१) व मयंक अगरवाल (६९) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात धावफलकावर १९५ धावा लावल्या. प्रत्युत्तरात, शिखर धवन व पृथ्वी शॉ यांनी दिल्लीला ५.३ षटकात ५९ धावांची सलामी दिली. शॉ ३२ धावा काढून परतल्यानंतरही धवनने आपला आक्रमक पवित्रा सोडला नाही. त्याने, ४९ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९२ धावा बनवत संघाचा विजय निश्चित केला. धवनच सामन्याचा मानकरी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
सहकार्यांना साथ देण्यासाठी वॉर्नर आणि विलियम्सनने पाळले रोजे, राशिद खान व्हिडिओ शेअर करत म्हणाला…