मुंबई क्रिकेटचा झंझावाती सलामीवीर आणि टीम इंडियाचा युवा स्टार पृथ्वी शॉ आता महाराष्ट्र क्रिकेट संघात सामील झाला आहे. अंडर-19 विश्वचषकाचा विजेता कर्णधार, कसोटी शतकवीर आणि आयपीएलमध्ये ठसा उमठवणारा शाॅ आता महाराष्ट्रासाठी खेळणार आहे आणि हा निर्णय केवळ देशांतर्गत संघ बदलण्याइतपत सोपा नाही, तर भारतीय क्रिकेटसाठीही महत्त्वपूर्ण आहे.
2024-25 च्या रणजी हंगामासाठी मुंबईने पृथ्वी शॉला आपल्या संघात स्थान दिलं नव्हतं. त्यामुळे नाराज झालेल्या शॉने आता महाराष्ट्र संघात सहभागी झाला आहे. असे म्हटंले जात आहे.
दरम्यान यावेळी बोलताना पृथ्वी शाॅ म्हणाला- “माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर महाराष्ट्र संघात सामील होणं, क्रिकेटपटू म्हणून माझ्या अधिक प्रगतीस मदत करेल, असा माझा ठाम विश्वास आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मला मिळालेल्या संधी आणि सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मनापासून आभारी आहे.
“अलीकडच्या काळात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने राज्यात क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्र प्रीमियर लीग, महिला एमपीएल, कॉर्पोरेट शील्ड आणि डी.बी. स्पर्धा हे त्यांच्या दूरदृष्टीचा आणि कार्यक्षमतेचा उत्तम नमुना आहेत. संघात ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, रजनीश गुरबानी आणि मुकेश चौधरी यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंमध्ये सामील होऊन खेळण्याची संधी मिळणार आहे, याचा मला विशेष आनंद आहे.” असं ही तो म्हणाला.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननेही या निर्णयाचं उत्साहात स्वागत केलं आहे. यावेळी अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, “शॉसारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू महाराष्ट्र संघात खेळणार, ही केवळ संघासाठी नव्हे, तर राज्यातील उगम पावणाऱ्या नव्या क्रिकेटपटूंनाही प्रेरणादायी ठरेल.”
महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सध्या चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) स्टार आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड करत आहे. अशा स्थितीत, शॉ आणि ऋतुराज हे दोघं आयपीएलमध्ये समोरासमोर खेळले असले तरी आता एकाच संघासाठी खेळताना पाहायला मिळतील.






