मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सनं तडाखेबाज सलामीवीर ‘पृथ्वी शॉ’ला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला खराब फॉर्ममुळे प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं आहे.
पृथ्वी शॉनं आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये काही चांगल्या खेळी खेळल्या असल्या तरी विशेषत: शेवटच्या 3 सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अत्यंत खराब राहिली. शॉ गेल्या 3 सामन्यात केवळ 34 धावाच करू शकला आहे. स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर आधीच प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. आज पृथ्वी शॉच्या जागी अभिषेक पोरेलनं जेक फ्रेझर मॅकगर्कसोबत ओपनिंग केली.
दिल्ली कॅपिटल्सचे मागील दोन सामने हाय स्कोअरिंग झाले आहेत. अशा स्थितीत संघाला पृथ्वी शॉ कडून चमकदार सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र तो सातत्यानं अपयशी ठरत आहे. त्याच्यामुळे संघ दोन्ही सामन्यांमध्ये सुरुवातीलाच संघर्ष करताना दिसला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीसमोर फक्त 90 धावांचं लक्ष्य होतं. शॉ कडे संघाला चांगली सुरुवात देऊन प्लेइंग इलेव्हनमधील आपलं स्थान निश्चित करण्याची संधी होती. मात्र या सामन्यातही तो 6 चेंडूत 7 धावा करून बाद झाला.
IPL 2024 मधील पृथ्वी शॉची कामगिरी
पृथ्वी शॉनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 26.43 च्या सरासरीनं केवळ 185 धावा केल्या आहेत. चालू हंगामातील पहिल्या 4 सामन्यांमध्ये शॉनं सुमारे 38 च्या सरासरीनं 151 धावा केल्या होत्या. मात्र गेल्या 3 सामन्यात त्याच्या बॅटमधून 11.3 च्या सरासरीनं केवळ 34 धावा निघाल्या आहेत. आयपीएलच्या या हंगामात तो केवळ 1 अर्धशतकी खेळी खेळू शकला आहे.
एकेकाळी ज्युनियर सेहवाग म्हटल्या जाणाऱ्या पृथ्वी शॉसाठी आयपीएलचा शेवटचा हंगामही चांगला राहिला नव्हता. आयपीएल 2023 मध्ये त्यानं 8 सामन्यात केवळ 106 धावा केल्या होत्या. आता 2024 मध्येही त्याची बॅट शांत राहिल्यानं शॉला त्याच्या तंत्रात बदल करण्याची गरज आहे, असं दिसतं.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्लीविरुद्ध मुंबई इंडियन्सची प्रतिष्ठा पणाला, दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 मध्ये बदल; जाणून घ्या