जयपूर। भारतात एकिकडे भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरु असताना दुसरीकडे विजय हजारे ट्रॉफी ही वनडे स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत गुरुवारी मुंबई विरुद्ध पाँडिचेरी संघात सामना झाला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने दमदार द्विशतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी केली. मुंबईकडून सलामीला उतरलेल्या शॉने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळताना १४२ चेंडूत २७ चौकारांसह द्विशतक पूर्ण केले. पुढे डावाची निर्धारीत ५० षटके संपेपर्यंत शॉ नाबाद राहिला. त्याने एकूण १५२ चेंडूत नाबाद २२७ धावा फटकावल्या. या खेळीत त्याने ३१ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त सुर्यकुमार यादवने ५८ चेंडूत १३३ धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईने ५० षटकात ४ बाद ४५७ धावांचा डोंगर उभा केला.
शॉने ही द्विशतकी खेळी करताना अनेक विश्वविक्रमांना धक्का दिला आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.
१. अ दर्जाच्या पुरुषांच्या क्रिकेटमध्ये २ वेळा ४५० किंवा त्यापेक्षा अधिक धावसंख्या केलेल्या संघाचा भाग असणारा आणि दोन्ही वेळेस शतकी खेळी करणारा पृथ्वी शॉ जगातील पहिला फलंदाज आहे. यापूर्वी भारत अ संघाकडून २०१८ साली लिसेस्टरशायर विरुद्ध खेळताना शॉने १३२ धावांची खेळी केली होती. त्यावेळी भारत अ संघाने ५० षटकात ४ बाद ४५८ धावा केल्या होत्या.
२. शॉ अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वोच्च धावा करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने ग्रॅमी पोलॉक यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. १९७४ साली पोलॉक यांनी नेतृत्व करताना नाबाद २२२ धावांची खेळी केली होती.
३. शॉ विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणाराही फलंदाज ठरला आहे. त्याने संजू सॅमसनने मागील हंगामात गोवा विरुद्ध केलेल्या नाबाद २१२ धावांच्या खेळीला मागे टाकले आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणारे फलंदाज –
२२७* – पृथ्वी शॉ (विरुद्ध पाँडिचेरी, २०२०-२१)
२१२* – संजू सॅमसन (विरुद्ध गोवा, २०१९-२०)
२०३ – यशस्वी जयस्वाल (विरुद्ध झारखंड, २०१९-२०)
२०२ – केव्ही कौशल (विरुद्ध सिक्कीम, २०१८-१९)
१८७ – अजिंक्य रहाणे (विरुद्ध महाराष्ट्र, २००७-०८)
४. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणारे भारतीय क्रिकेटपटू
२६४ धावा – रोहित शर्मा (विरुद्ध श्रीलंका, कोलकाता, २०१४)
२४८ धावा – शिखर धवन, (विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ, प्रिटोरिया, २०१३)
२२७* धावा – पृथ्वी शॉ (विरुद्ध पाँडिचेरी, जयपूर, २०२१)
महत्त्वाच्या बातम्या –
जो रूट ऑन फायर! अवघ्या ८ धावा देत बळींचा पंचक, ३८ वर्षांनंतर केला ‘तो’ हिट विक्रम
लीचची फिरकी अन् रोहितची गिरकी! फक्त ३ कसोटी सामन्यात चक्क ४ वेळा धाडलंय तंबूत
एकचं नंबर भावा! पृथ्वी शॉचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, विजय हजारे ट्रॉफीत शतकानंतर झुंजार द्विशतक