आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार यूएई आणि ओमानमध्ये पार पडला. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु ऑस्ट्रेलियन संघाने अप्रतिम कामगिरी केली आणि जेतेपदावर आपले नाव कोरले. रविवारी (१४ नोव्हेंबर) पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाला ८ गडी राखून पराभूत केले. या सामन्यानंतर विजयी संघांना किती धनराशी मिळाली? हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. याबाबत आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत.
आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदावर नाव कोरले. या चमकदार कामगिरीनंतर त्यांना बक्षीस म्हणून १२ कोटी रुपये मिळाले आहेत. तर या मोठ्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवणाऱ्या न्यूझीलंड संघाला आयसीसीकडून ६ कोटी रुपये मिळाले आहेत. विजेत्यांसह उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांवर देखील बक्षिसांचा वर्षाव झाला आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात मॅथ्यू वेडने तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलिया संघाचा अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग मोकळा केला होता. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या पाकिस्तान आणि इंग्लंड संघाला प्रत्येकी ३-३ कोटी बक्षीस म्हणून देण्यात आले आहे. तसेच ३ सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला १ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
दरम्यान अंतिम सामन्यात, ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना केन विलियमसनने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. तर मार्टिन गप्टीलने २८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ४ बाद १७२ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून मिचेल मार्शने नाबाद ७७ धावांची तर डेविड वॉर्नरने ५३ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलिया संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या-
नव्या टी२० विश्वविजेत्यांचं कौतुक! क्रिकेटविश्वातून ऑस्ट्रेलियावर शुभेच्छांचा पाऊस, पाहा ट्वीट्स