प्रो कबड्डीमध्ये आज यु मुंबा आणि यु.पी.योद्धा यांच्यात सामना झाला. हा सामना यु मुंबाने ३७-३४ असा जिंकला. या सामन्यात यु मुंबासाठी शब्बीर बापु, अनुप कुमार आणि डिफेंडर सुरिंदर सिंग यांनी उत्तम कामगिरी केली. यांच्या कामगिरीच्या जोरावर यु मुंबा विजयी झाला. यु.पी संघासाठी रिशांक देवाडीगा आणि नितीन मदने यांनी उत्तम कामगिरी केली, पण ते संघाला विजय मिळवुन देऊ शकले नाहीत.
पहिल्या रेडपासूनच या सामन्यात गुणांचे खाते खोलले गेले. नितीन तोमरने यु.पीसाठी पहिला गुण मिळवला. यु मुंबाची पुढील रेड अनुपने एम्प्टी केली. पुढील रेडसाठी आलेल्या रिशांकने या रेडमध्ये तीन गुण मिळवत या सामन्यात यु.पीला ४-० अशी बढत मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघातील रेडर्सने गुण मिळवण्यास सुरुवात केली. अनुप आणि शब्बीर यु मुंबासाठी गुण मिळवत होते तर नितीन आणि रिशांक ही यु.पी.योद्धासाठी गुण मिळवत होते.
पहिल्या सत्रात १२व्या मिनिटाला यु मुंबावर ऑल आऊट होण्याची नामुष्की आली. यु मुंबाला ऑल आऊट करत यु.पी.ने त्याची आघाडी १२-४ अशी केली. त्यानंतर अनुप आणि शब्बीरने रेडींगमध्ये उत्तम कामगिरी केली. याचा फायदा यु मुंबाला झाला. पहिले सत्र संपले तेव्हा यु.पी. योद्धा १५-१२ अशा तीन गुणांच्या आघाडीवर होते.
दुसऱ्या सत्रात पहिला मिनीटात यु.पी.ला ऑल आऊट करत यु मुंबाने सामना १६-१६ असा बरोबरीत आणला. दुसऱ्या सत्रात ६ व्या मिनिटाला हा सामना २०-२० असा बरोबरीत झाला. दहाव्या मिनिटाला यु मुंबा ऑल आऊट झाली आणि सामना २९-२६ असा यु.पी.च्या बाजुने झुकला. शेवटच्या काही मिनिटात सामना सुरिंदर सिंग आणि शब्बीर बापू यांच्या जिगरबाज खेळामुळे यु मुंबाकडे झुकला. शेवटी हा सामना यु मुंबाने ३७-३४ असा जिंकला.
या सामन्यात यु मुंबाकडून शब्बीरने रेडींगमध्ये सर्वाधिक १२ गुण मिळवले, या मोसमातील स्वतःचा पहिला ‘सुपर टेन’ डिफेन्समध्ये युवा खेळाडू सुरिंदर सिंग याने ‘हाय ५’ मिळवला. यु.पी. योद्धांकडून रिशांकने त्याची वैयक्तिक सर्वोत्तम खेळ करत १४ गुण मिळवले. त्यातील सारे टच गुण होते हे विशेष. यु मुंबाला विजय साध्य करण्यात अनुभवाचा फायदा झाला.