Pro Kabaddi 10: प्रो कबड्डी लीग 2023 स्पर्धेतील 16वा सामना रविवारी (दि. 10 डिसेंबर) बंगळुरूच्या श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम येथे बंगाल वॉरियर्स विरुद्ध तमिल थलायवाज संघात पार पडला. हा सामना बंगालने 48-38 अशा फरकाने जिंकला. 10 पॉईंट्सने विजय मिळवताच बंगालने स्पर्धेत खेळलेल्या 3 सामन्यांतील दुसरा विजय नोंदवला. तसेच, गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. तमिल थलायवाज संघाचा पहिल्या दोन सामन्यातील हा पहिला पराभव आहे. बंगालने दुसऱ्या हाफमध्ये जबरदस्त पुनरागमन करत सामना पालटला.
या सामन्यात बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors) संघासाठी रेडिंगमध्ये कर्णधार मनिंदर सिंग (Maninder Singh) याने सर्वाधिक 16 गुण मिळवले. तसेच, डिफेन्समध्ये शुभम शिंदे याने कमाल करत 11 टॅकल गुण मिळवले. तमिल थलायवाज (Tamil Thalaivas) संघाकडून रेडिंगमध्ये नरेंदर कंडोला याने 11 रेड गुण मिळवले. तसेच, डिफेन्समध्ये साहिल आणि सागरने प्रत्येकी 3 टॅकल गुण मिळवले.
मनिंदर आणि शुभमचा जलवा
तमिल थलायवाजने पहिल्या हाफनंतर 27-21ने आघाडी घेतली होती. बंगालला त्यांच्या रेडर्सने चांगली सुरुवात करून दिली आणि त्यामुळे ते लवकर तमिलला सर्वबाद करण्याच्या जवळ पोहोचले होते. एकदा अजिंक्य पवारने आपल्या संघाला नक्कीच वाचवले, पण सातव्या मिनिटात शेवटी तमिल संघ सर्वबाद झाला. त्यानंतर तमिलने पलटवार केला आणि बंगालला कोणतीच संधी दिली नाही. त्यामुळे 12व्या मिनिटाला बंगाल संघ सर्वबाद झाला. तमिलने आपली पकड कमी पडू दिली नाही आणि पूर्णपणे वर्चस्व राखले. पहिला हाफ संपत असताना बंगाल संघ दुसऱ्यांदा सर्वबाद झाला. यावेळी नरेंदर कंडोलाने त्याचा सुपर 10 पूर्ण केला.
दुसऱ्या हाफची सुरुवात संथ गतीने झाली आणि यादरम्यान बंगालवर दबाव जास्त होता. त्यात बंगालचा कर्णधार मनिंदरने सुपर रेड मारत फक्त तमिलचे तीन डिफेंडर्सला बाद केले नाही, तर आपला सुपर 10देखील पूर्ण केला. बंगालला या संधीची गरज होती आणि लवकरच तमिलला दुसऱ्यांदा सर्वबाद केले. यानंतर बंगालने शानदार पद्धतीने संघाची आघाडी पुढे कायम ठेवली आणि संपूर्ण दबाव थलायवाजवर टाकला.
तमिलच्या रेडर्सला खास प्रदर्शन करता आले नाही. तसेच, डिफेन्समध्येही चुका पाहायला मिळाल्या. त्यामुळे बंगाल संघ 35व्या मिनिटात तिसऱ्यांदा तमिलला सर्वबाद करण्यात यशस्वी झाला. बंगालसाठी शुभम शिंदेने त्याचा सुपर 10 पूर्ण केला. इथून सामना तमिलच्या हातातून निसटताना दिसत होता आणि अंतरही जास्त झाले होते. अखेरीस तमिल पराभवाचे अंतर 7च्या आत ठेवण्यात यशस्वी झाला नाही आणि त्यांना एकही गुण मिळाला नाही. बंगाल वॉरियर्सने जबरदस्त विजय मिळवत 13 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. (pro kabaddi 2023 bengal warriors vs tamil thalaivas 16th match bengal won by 10 points PKL 10)
हेही वाचा-
PKL 2023मध्ये ‘डुबकी किंग’ ने घडवला इतिहास, यूपीचा हरियाणाविरुद्ध 30 गुणांनी रोमांचक विजय
PKL 2023: पवनचे ऐतिहासिक प्रदर्शन ठरले व्यर्थ, पटना पायरेट्सचा तब्बल 22 गुणांनी दणदणीत विजय