भारत आणि इंग्लंड संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका अंतिम चरणात आली आहे. यजमान संघाने अवघ्या २ दिवसांत पाहुण्यांना चितपट करत १० विकेट्सने तिसरा कसोटी सामना जिंकला होता. यासह भारतीय संघ मालिकेत सध्या २-१ ने आघाडीवर आहे. अशात ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारत विजयी घौडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल. त्या अनुषंगाने भारताचा कर्णधार विराट कोहली अशाप्रकारची प्लेइंग इलेव्हन निवडू शकतो.
सलामीवीर:
शुबमन गिल-
पहिल्या ३ कसोटी सामन्यांप्रमाणे चौथ्या कसोटीतही युवा क्रिकेटपटू शुबमन गिल सलामीला फलंदाजी करताना दिसेल. मालिकेतील पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावत शुबमनने चांगली सुरुवात केली होती. परंतु पुढील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याची बॅट शांत असल्याचे दिसून आले. अशात संधीची वाट पाहात असलेले सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांना शुबमनचा पर्याय समजले जात आहे. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत शुबमनने रोहित शर्मासोबत सलामीला येऊन भारतीय संघाला काही सामन्यात चांगली सुरुवात करून दिली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत त्याला शेवटची संधी दिली जाऊ शकते.
रोहित शर्मा-
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावत आहे. या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रोहित शर्माने ६६ धावांची महत्वाची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात ४९ धावांचा पाठलाग करत असताना षटकार मारत भारतीय संघाला सामना जिंकवून दिला होता. यासोबतच त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात १६१ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने सामना ३१७ धावांनी जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघाला लयीच असलेल्या रोहितकडून चौथ्या कसोटीतही धमाकेदार खेळीची अपेक्षा असणार.
मधल्या फळीतील फलंदाज:
चेतेश्वर पुजारा –
भारतीय कसोटी संघाची ‘नवी द वॉल’ म्हटला जाणारा चेतेश्वर पुजारा या मालिकेत एकही शतकी खेळी करू शकला नाही. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ७३ धावांची खेळी करत त्याने मालिकेची जोरदार सुरुवात केली होती. परंतु पुढील २ सामन्यात त्याला साधे अर्धशतकही करता आले नाही. त्यामुळे चौथ्या कसोटीला अविस्मरणीय बनवण्याच्या दृष्टीने तो मोठी आकडी खेळी करण्यास प्रयत्नशील असेल.
विराट कोहली (कर्णधार) –
नेहमीप्रमाणे या सामन्यातही कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. तो संघाला अखेरचा कसोटी सामना जिंकवून देत मालिकेसह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारण्याचा प्रयत्न करेल. याबरोबरच कसोटीतील आपल्या शतकाचा दुष्काळही संपवण्याच्या तयारीत असेल.
अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) –
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत झुंजर शतक करणारा अजिंक्य रहाणे इंग्लंडविरुद्ध साजेशी कामगिरी शकलेला नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मासोबत मिळून त्याने शानदार भागिदारी रचली होती आणि संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले होते. परंतु अखेरच्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून मोठ्या आकडी खेळाची सर्वांना अपेक्षा असणार.
रिषभ पंत – (यष्टीरक्षक)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्धही रिषभ पंतने आपली लय कायम ठेवली आहे. पहिल्याच कसोटीत त्याने ९१ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. परंतु पुढील २ सामन्यात त्याला २ आकडी धावसंख्याही करता आली नाही. हीच कमी तो चौथ्या सामन्यात पूर्ण करताना दिसेल. याबरोबरच त्याच्या यष्टीरक्षणातही बरेच सुधार झाल्याने यष्टीमागील कामगिरीतही तो संघाला निराश करणार नाही.
अष्टपैलू:
अक्षर पटेल –
इंग्लंडविरुद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात करणारा अक्षर पटेल सध्या चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आतापर्यंत खेळलेल्या २ कसोटी सामन्यात त्याने ३ वेळा बळींचा पंचक घेण्याचा कारनामा केला आहे. याबरोबरच तिसऱ्या कसोटीत त्याने एकूण ११ विकेट्स चटकावल्या होत्या. त्यामुळे चौथ्या कसोटीतही तो दमदार गोलंदाजी करताना दिसेल. याखेरीज तो फलंदाजतही हात आजमावण्याचा प्रयत्न करेल.
आर अश्विन-
आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध आपल्या अष्टपैलू कामगिरीचा नमुना दाखवला आहे. दुसऱ्या सामन्यात ८ विकेट्स आणि शतकी कामगिरी त्याने केली होती. याबरोबरच तिसऱ्या सामन्यातही ७ विकेट्सचे योगदान दिले होते. अखेरच्या कसोटीतही त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल.
गोलंदाज:
कुलदीप यादव –
सतत संघातून आत-बाहेर होत राहणाऱ्या कुलदीप यादवला या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली होती. यावेळी त्याने २ विकेट्स घेतल्या होत्या. अशात कर्णधार विराट कोहली त्याला चौथ्या कसोटीत पुन्हा संधी देऊ शकतो.
उमेश यादव –
चौथ्या कसोटीपुर्वी भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणामुळे मागार घेतली आहे. अशात उमेश यादवला संधी मिळणे जवळपास ठरल्यात जमा आहे.
मोहम्मद सिराज –
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपल्या वेगवान गोलंदाजीने मोठमोठ्या फलंदाजांना मोहम्मद सिराजने गारद केले होते. परंतु इंग्लंडविरुद्ध त्याची गोलंदाजी थंडावल्याचे दिसून आले. मात्र अखेरच्या कसोटीत तो ही कमी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
असा असेल भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: पाकिस्तानचे विश्वविजयाचे स्वप्न पूर्ण करणारा इंझमाम-उल-हक
चौथ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाची डोकेदुखी वाढली, ‘या’ चार खेळाडूंपैकी कोणाची करायची संघात निवड?
‘वर्ल्ड रोड सेफ्टी सीरीज’ आधी युवी आणि सचिन जपतायेत स्वतःची सेफ्टी, पाहा भन्नाट फोटो