शनिवारी 23 वर्षांखालील कर्नल सीके नायडू स्पर्धेतील पाँडीचेरी विरुद्ध मणिपूर सामन्यात पाँडीचेरीकडून सिदक सिंग या 19 वर्षीय फिरकी गोलंदाजाने एका डावात 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.
त्याने सीएपी सिएचेम ग्राउंडवर सुरु असलेल्या या सामन्यात मणिपूर संघाला पहिल्या डावात 71 धावांवर सर्वबाद केले. त्याने हे 10 विकेट 17.5 षटकात घेताना 31 धावा दिल्या. तसेच 7 षटके निर्धाव टाकली आहेत.
मुळचा मुंबईचा असणाऱ्या सिदाक सिंगची गोलंदाजी शैली बिशन सिंग बेदींसारखी आहे. तो मुंबईकडून 7 टी20 सामन्यातही खेळला आहे. तसेच तो 15 वर्षांखालील क्रिकेट खेळत असताना त्याचा 2015 मध्ये वेस्ट झोन टी20 क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी मुंबई संघात समावेश करण्यात आला होता.
त्यामुळे तो मुंबईच्या वरिष्ठ संघात खेळणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नंतरचा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.
पाँडीचेरी विरुद्ध मणिपूर सामन्यात सिद्दाक सिंगच्या गोलंदाजीच्या जोरावर मणिपूरचा संघ जरी स्वस्तात बाद झाला असला, तरी मात्र पाँडीचेरीच्या फलंदाजांना त्याचा फायदा घेता आला नाही. पाँडीचेरीचा पहिला डाव 105 धावांत संपुष्टात आला.