औरंगाबाद । एड्युरन्स् मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स् सनराईज् इएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात हरियाणाच्या आठव्या मानांकीत युवान नांदलने तर मुलींच्या गटात तामिळनाडूच्या कुंदना भंडारूने विजेतेपद पटकावले.
इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस् कॉम्पलेक्स् येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदाच्या लढतीत मुलांच्या गटात हरियाणाच्या आठव्या मानांकीत युवान नांदलने आपली विजयी घोडदैड कायम राखत मध्यप्रदेशच्या दुस-या मानांकीत आयुष्मान अरजेरियाचा 7-5, 6-2 असा दोन सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. हा सामना दोन तास चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये युवानने सुरेख सुरूवात करत पहिल्याच गेममध्ये आयुषमानची सर्व्हिस भेदली. या सेटमध्ये युवानने वर्चस्व राखत तिस-या , नवव्या व आकराव्या गेममध्ये आयुषमानची सर्व्हिस रोखली व हा सेट 7-5 अशा फरकाने जिंकुन आघाडी घेतली. दुस-या सेटमध्ये युवानने आयुषमानला कोणतीही संधी न देता पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-2 अशा फरकाने सहज जिंकुन विजेतेपदावर आपले नाव कोरले. युवान हा हरियाणा रोहतक राजिव गांधी स्टेडीयम येथे निखिल हुडा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात तामिळनाडूच्या चौदाव्या मानांकीत कुंदना भंडारूने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पाचव्या मानांकीत श्रृती अहलावतचा 6-2, 6-3 असा सरळ सेट मध्ये पराभव करत विजेतेपद राखले. कुंदना ही तामिळनाडू टेनिस असोसिएशन येथे प्रशिक्षक श्रीनिवास राव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 13 वर्षीय आलगाप्पा स्कुल येथे नवव्या इयत्तेत शिकते. तीचे हे पहिलेच राष्ट्रीय विजेतेपद आहे.
विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एड्युरन्स्चे सुरक्षा विभागाचे प्रमुख व सीएसआर संजय दत्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर, ईएमएमटीसीचे सेंट्रल हेड आशुतोष मिश्रा, डॉ.अश्विनी जैस्वाल, गजेंद्र भोसले, ईएमएमटीसीचे मुख्य प्रशिक्षक आर चंदन, प्रविण गायसमुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:एकेरी गट अंतिम फेरी: मुले:
युवान नांदल(हरियाणा)(8)वि.वि. आयुष्मान अरजेरिया(मध्यप्रदेश)(2) 7-5, 6-2
एकेरी गट अंतिम फेरी: मुली:
कुंदना भंडारू(तामिळनाडू)(14) वि.वि. श्रृती अहलावत(5) 6-2, 6-3