इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन येत्या एप्रिल-मे महिन्यात केले जाणार आहे. या हंगामासाठी सगळ्याच संघांनी कसून तयारी सुरु केली आहे. मात्र या हंगामापूर्वी किंग्ज इलेव्हनच्या संघाने आपल्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. आता यापुढील हंगामांसाठी पंजाबच्या संघाचे नाव ‘पंजाब किंग्ज’ असे असणार आहे.
मात्र पंजाबच्या या निर्णयामागील कारण समोर आले नव्हते. नाव बदलण्याचा निर्णय नक्की का घेण्यात आला, याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र आता ते कारण समोर आले आहे. खुद्द संघमालकांनीच या गोष्टीचा उलगडा केला आहे.
नवे रूप, नवा उत्साह
किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक मोहित बर्मन यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबचे ‘पंजाब किंग’ असे नवे नामकरण करण्यामागील कारण सांगितले आहे. संघाला एक नवे रूप देण्यासाठी आणि नवीन उर्जा संघात भरण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे केवळ नावच नव्हे तर संघाच्या लोगोमध्येही बदल करण्यात येणार असल्याची माहिती बर्मन यांनी दिली. बुधवारी सगळे संघमालक संघाच्या या नव्या लोगोचे अनावरण करतील.
पुढील किमान एका वर्षासाठी संघाचे हे नवीन नाव कायम राहील, अशी माहिती मोहित बर्मन यांनी यावेळी दिली. तसेच नाव बदलण्याचा निर्णय केवळ अंतर्गत टीमने घेतला नसून संघाचे हितचिंतक व इतर लोकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर घेतला गेला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आयपीएलच्या लिलावाच्या आठवड्यातच पंजाबच्या संघाने हा निर्णय घेतला आहे. तसेच लिलावाच्या एक दिवस आधी नव्या नावाचे आणि लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे.
पहिले विजेतपद पटकावण्याचे प्रयत्न
पंजाबच्या संघाची मालकी मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रिती झिंटा आणि करण पॉल यांच्याकडे आहे. आयपीएलच्या मागील तेराही हंगामात हा संघ सहभागी झाला असला तरी त्यांना एकदाही विजेतेपद पटकावता आले नाहिये. केवळ एकदा अंतिम फेरी गाठण्यात त्यांना यश मिळाले आहे. आणि एका हंगामात त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.
त्यामुळे येत्या हंगामात नाव बदलण्यासह हा इतिहास बदलण्याचाही पंजाबचा संघ प्रयत्न करेल. केएल राहुलला आगामी हंगामासाठी पंजाबने कर्णधारपदी कायम ठेवले असून येत्या लिलावाद्वारे मजबूत संघबांधणी करण्याचे उद्दिष्ट पंजाबचे आहे.
महत्वाच्या बातम्या:
बिग ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
मित्रप्रेम की योगायोग? १७ फेब्रुवारी डिविलियर्स आणि डू प्लेसिससाठी ठरतोय खास दिवस
रग्बी खेळाडू ते देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार : जाणून घ्या फाफ डू प्लेसिसबद्दल रंजक गोष्टी