मंगळवारी (दि. 27 जून) महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स संघात पार पडला. हा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा होता. या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने ईगल नाशिक टायटन्स संघाला 3 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. तसेच, विजय आपल्या खिशात घालून क्वालिफायर दोन सामन्यात प्रवेश घेतला. या सामन्यात पुणेरी बाप्पाच्या विजयाचा शिल्पकार अद्वय शिधाये ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात पुणेरी बाप्पा (Puneri Bappa) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे 18 षटकांचा सामना खेळवण्यात आला. यावेळी फलंदाजी करताना नाशिकने 8 विकेट्स गमावत 131 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पुण्याने 17.5 षटकात 7 विकेट्सच्या मोबदल्यात 132 धावा केल्या. तसेच, 3 विकेट्स आणि 1 चेंडू शिल्लक ठेवत क्वालिफायर-2 (Qualifier- 2) सामन्यामध्ये प्रवेश केला.
अद्वय शिधाये चमकला
पुण्याकडून फलंदाजी करताना अद्वय शिधाये (Advay Shidhaye) चमकला. त्याने पुण्यासाठी सर्वाधिक खेळी केली. त्याने यावेळी 13 चेंडूंचा सामना करताना नाबाद 27 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 चौकार आणि 2 षटकारांचीही बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर पवन शाह आणि यश क्षीरसागर यांनी प्रत्येकी 25 धावा केल्या. याव्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही. मात्र, या खेळाडूंच्या जोरावर पुण्याने विजय खेचून आणला.
यावेळी नाशिककडून गोलंदाजी करताना रेहान खान (Rehan Khan) याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 20 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त अक्षय वायकर आणि प्रशांत सोलंकी यांनी अनुक्रमे 2 आणि 1 विकेट नावावर केली.
राहुलची झुंजार खेळी व्यर्थ
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना नाशिक संघाचा कर्णधार राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) चमकला. मात्र, त्याचे प्रयत्न तोकडे पडले. राहुलने यावेळी 41 चेंडूंचा सामना करत 60 धावा चोपल्या होत्या. त्याने या खेळीत 1 षटकार आणि 9 चौकारांची बरसात केली होती. त्याच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांचा आकडाही पार करू शकला नव्हता. त्यामुळे नाशिक संघ 8 षटकात फक्त 131 धावाच करू शकला.
यावेळी पुण्याकडून गोलंदाजी करताना तीन खेळाडूंनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यात कर्णधार रोहन दामले (Rohan Damle), सोहन जमाले आणि सचिन भोसले यांचा समावेश आहे. तसेच, पीयुष साळवी यालाही 1 विकेट घेण्यात यश आले. (Puneri Bappa won by 3 wickets against Eagle Nashik Titans in eliminator match maharashtra premier league 2023)
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या आयर्लंड दौऱ्याची घोषणा! वनडे विश्वचषकापूर्वी संघ खेळणार महत्वाची मालिका
WC 2023 । न्यूझीलंडचा कर्णधार आगामी विश्वचषकात खेळणार? चाहत्यांसाठी आनंदाची बातमी