आयपीएलच्या या हंगामात पंजाब किंग्जसाठी काहीही ठीक चाललेलं नाही. संघानं 6 पैकी फक्त 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून ते गुणतालिकेत 4 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहेत. शेवटच्या सामन्यात त्यांना राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पंजाबचा कर्णधार शिखर धवनबद्दल वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी वाचून पंजाबच्या फॅन्सना नक्कीच धक्का बसेल.
शिखर धवन राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. धवनच्या अनुपस्थितीत सॅम करननं पंजाब किंग्जची कमान सांभाळली होती. आता त्याच्या फिटनेसबाबत नवीन अपडेट समोर आलं आहे. धवन फक्त एका सामन्यातून नाही तर पुढच्या काही सामन्यांतून बाहेर पडणार असल्याचं दिसून येतंय.
शिखर धवनच्या दुखापतीबाबत पंजाब किंग्जच्या क्रिकेट डेव्हलपमेंटचे प्रमुख संजय बांगर म्हणाले की, “खांद्याला दुखापत झाल्यामुळे तो राजस्थानविरुद्ध खेळू शकला नाही. तो पुढील काही सामन्यांसाठी संघाबाहेर राहू शकतो. आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि तो उपचारांना कसा प्रतिसाद देतो हे पाहावं लागेल. परंतु आता असं दिसतं की तो पुढील 7 ते 10 दिवसांसाठी बाहेर असू शकतो.”
पुढील 10 दिवसांत पंजाब किंग्जला घरच्या मैदानावर दोन सामने खेळायचे आहेत. पहिला सामना गुरूवार, 18 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. यानंतर पंजाबचा पुढील सामना रविवारी, 21 एप्रिल रोजी गुजरात टायटन्सशी होणार आहे.
आयपीएलच्या या हंगामात पंजाब किंग्जची स्थिती खूपच वाईट आहे. संघानं आतापर्यंत 6 सामने खेळले, ज्यापैकी त्यांना फक्त 2 जिंकता आले आहेत. पंजाबनं आयपीएल 2024 ची सुरुवात विजयानं केली होती. पहिल्या सामन्यात त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा 4 गडी राखून पराभव केला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध त्यांना सलग पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर पुढच्या सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्सचा 3 गडी राखून पराभव केला. यानंतर हैदराबाद आणि राजस्थानविरुद्धच्या पुढील दोन सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! रिषभ पंतवर बंदी घातली जाणार? दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार मोठ्या अडचणीत… Rishabh Pant
अंगावर काटे आणणाऱ्या सामन्यात राजस्थानचा पंजाबवर 3 गडी राखून विजय
6 चेंडूत 6 षटकार! नेपाळच्या क्रिकेटपटूनं केला कहर, युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी