टोकियो। ऑलिंपिक २०२० मध्ये बुधवारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने महिला एकेरी गटात हाँगकाँगच्या चेउंग न्गन यी हिला पराभूत करत अंतिम १६ जणींच्या फेरीत (उपउपांत्यपूर्व फेरी) प्रवेश केला आहे. सिंधूने चेउंग न्गन यीला २१-९, २१-१६ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले आहे. त्यामुळे बॅटमिंटनमधील भारताचे आव्हान टिकून राहिले आहे.
साल २०१६ च्या रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सिंधूने बुधवारी चेउंग न्गन यीविरुद्ध पहिल्या सेटमध्ये पूर्णपणे वर्चस्व राखले होते. तिने पहिल्या सेटमध्ये सुरुवातीलाच १२ पॉइंट्सने आघाडी मिळवली होती. त्यामुळे ती हा सेट सहज जिंकली. दुसऱ्या सेटमध्ये चेउंग न्गन यीने सिंधूचा चांगला प्रतिकार केला. तिने सिंधूला टक्कर देताना ११-११ अशी बरोबरी केली होती. पण नंतर सिंधूने आपला खेळ उंचावत हा सेटही जिंकला आणि सामना जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला.
या विजयासह आता सिंधूने बाद फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूकडून भारतीयांना सलग दुसऱ्या ऑलिंपिक पदकाची अपेक्षा आहे. पण आता सिंधूला दुसरे ऑलिंपिक पदक मिळवण्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे.
भारताचे अन्य बॅडमिंटनपटू पदकाच्या शर्यतीतून बाहेर
सध्या सिंधू ही बॅडमिंटनमध्ये पदक मिळवण्यासाठी भारताची एकमेव आशा आहे. कारण पुरुष एकेरी गटात खेळणारा साई प्रणीत बाद फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला आहे. त्याचबरोबर पुरुष दुहेरी गटात खेळणाऱ्या सात्विकसाईराज रानिकरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीचेही आव्हान संपुष्टात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गुड न्यूज! हॉकीमध्ये भारतीय संघाचा दुसरा विजय; स्पेनला चारली ३-० ने धूळ