पुणे, 16 नोव्हेंबर 2023- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत सिद्धेश वीर(150धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदु जिमखाना संघाने दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा 7 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदु जिमखाना क्रिकेट मैदानावरील अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 50 षटकात 7बाद 309धावा केल्या. यात विनय पाटीलने 138चेंडूत 12चौकार व 7 षटकारासह 152 धावा चोपल्या. त्याला टिळक जाधवने 31 धावा काढून साथ दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 102चेंडूत 107धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. पीवायसीकडून आदित्य डावरे(3-63), दिव्यांग हिंगणेकर(2-57), गुरवीर सिंग सैनी(1-28) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
हे आव्हान पीवायसी हिंदु जिमखाना संघाने 39.2 षटकात 3बाद 314धावा करुन पुर्ण केले. सलामवीर सिद्धेश वीरने अफलातून फटकेबाजी करत 113 चेंडूत 13चौकार व 9 षटकाराच्या मदतीने 150 धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सिध्देशने श्रेयश वाळेकर(49धावा)च्या साथीत पहिल्या गड्यासाठी 155 चेंडूत 185 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर स्वप्नील फुलपगारने 45चेंडूत 8चौकार व 6 षटकाराच्या साहाय्याने नाबाद 83धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेतील विजेत्या पीवायसी हिंदू जिमखाना संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण दोशी इंजिनिअर्सचे संचालक अमित दोशी, रानडे रिअलटर्सचे संचालक केदार रानडे, राजीव एंटरप्रायझेसचे संचालक विजय जना, पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे सचिव व एमसीएच्या एपेक्स कमिटीचे सदस्य विनायक द्रविड आणि पाथ-वे फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजीत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल: अंतिम फेरी:
दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी:50 षटकात 7बाद 309धावा(विनय पाटील 152(138, 12×4,7×6), टिळक जाधव 31, रोहित चौधरी 28, अंश धूत 23, मनोज यादव नाबाद 18, आदित्य डावरे 3-63, दिव्यांग हिंगणेकर 2-57, गुरवीर सिंग सैनी 1-28) पराभुत वि.पीवायसी हिंदु जिमखाना: 39.2 षटकात 3बाद 314धावा(सिद्धेश वीर 150(113,13×4,9×6), स्वप्नील फुलपगार नाबाद 83(45,8×4,6×6), श्रेयश वाळेकर 49(64,5×4), दिव्यांग हिंगणेकर 14, अद्वैय शिधये नाबाद 6, रोहित चौधरी 2-64); सामनावीर – सिद्धेश वीर; पीवायसी संघ 7 गडी राखून विजयी. (PYC Hindu Gymkhana Team Wins Doshi Engineers Trophy Inter Club Senior Cricket Tournament)
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: यश नाहर
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: टिळक जाधव
मालिकावीर: दिव्यांग हिंगणेकर.
महत्वाच्या बातम्या –
पप्पु हळदणकर स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत नील मुळ्येला तिहेरी मुकुट
मोठी बातमी: World Cup Final ला पंतप्रधान मोदी लावणार हजेरी, पाहणार संपूर्ण सामना