मुंबई। काल(14 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने या सामन्यात शानदार शतक ठोकले. त्याने 112 चेंडूत नाबाद 128 धावा केल्या. यामध्ये त्याने 17 चौकार आणि 3 षटकार मारले. वनडेतील हे त्याचे 18 वे शतक आहे. यासह, त्याने एक विशेष कामगिरी देखील केली.
त्याने वनडे कारकिर्दीत 5000 धावा पूर्ण करण्याचा टप्पाही पार केला आहे. त्याच्या आता 117 वनडे सामन्यातील 115 डावात 46.95 च्या सरासरीने 5118 धावा झाल्या आहेत. त्यामुळे तो वनडेत सर्वात जलद 5000 धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू ठरला आहे.
वॉर्नरने इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटला या यादीत मागे टाकले आहे. रुटने 116 वनडे डावात 5000 धावांचा टप्पा पार केला होता. या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हाशिम अमला आहे. त्याने 101 वनडे डावात 5000 धावा केल्या होत्या. तर दिग्गज क्रिकेटपटू विव रिचर्ड्स आणि विराट कोहली संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
विशेष म्हणजे वॉर्नर ऑस्ट्रेलियासाठीही सर्वात जलद 5000 धावा करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने माजी क्रिकेटपटू डीन जोन्सला सर्वात जलद 5000 वनडे धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या यादीत मागे टाकले आहे. जोन्स यांनी 128 वनडे डावात हा टप्पा पार केला होता.
#वनडेत सर्वात जलद 5000 धावा करणारे क्रिकेटपटू –
101 डाव – हाशिम अमला
114 डाव – विव रिचर्ड्स
114 डाव – विराट कोहली
115 डाव – डेव्हिड वॉर्नर
116 डाव – जो रुट
#वनडेत सर्वात जलद 5000 धावा करणारे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू –
115 डाव – डेव्हिड वॉर्नर
128 डाव – डिन जोन्स
133 डाव – मॅथ्यू हेडन
तब्बल १५ वर्षांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडली ती नकोशी गोष्ट
वाचा????https://t.co/wCHuDZ9PwZ????#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvAUS— Maha Sports (@Maha_Sports) January 14, 2020
https://twitter.com/Maha_Sports/status/1217126940580016128