गुवाहाटी । खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात मैदानी स्पर्धेतील अखेरच्या सत्रात महाराष्ट्राच्या पूर्णा रावराणे हिने २१ वर्षाखालील मुलींच्या गटात गोळाफेकीत सुवर्णपदक मिळविताना स्पर्धा विक्रम नोंदविला. तिने १४.५७ मीटर्सपर्यंत गोळाफेक करीत अनामिका दास हिने गतवर्षी नोंदविलेला १४.१० मीटर्स हा विक्रम मोडला.
पाचव्या प्रयत्नात पूणार्ने सर्वोत्तम कामगिरी केली. ती सावंतवाडीजवळील वैभववाडी येथील रहिवासी असून सध्या ती मालाड येथे हिरेन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. गतवर्षी तिला रौप्यपदक मिळाले होते. तिचे वडील सुबोध हे मुष्टीयोद्धे असून तिची बहीण कस्तुरी ही अडथळा शर्यतीत भाग घेत असते.
अडथळा शर्यतीत प्रांजलीला रौप्य तर प्रियाला ब्राँझ
महाराष्ट्राच्या प्रांजली पाटील व प्रिया गुप्ता यांनी १७ वर्षाखालील मुलींच्या १०० मीटर्स अडथळा शर्यतीत अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक पटकाविले. या दोन्ही खेळाडू मुंबई येथे जसपालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
याच वयोगटात प्रिया पाटील, शिवेच्छा पाटील, पूर्वा सावंत व तितिक्षा पाटोळे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने ४ बाय ४०० मीटर्स रिलेत ब्राँझपदक पटकाविले. त्यांनी ही शर्यत ३ मिनिटे ५९.०८ सेकंदांत पार केली.
मुलींच्या २१ वर्षाखालील गटात वैष्णवी यादव, दुर्गा देवरे, कीर्ति भोईटे व निधी सिंग यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राला ४ बाय ४०० मीटर्स रिलेत ब्राँझपदकाची कमाई झाली. त्यांनी हे अंतर ३ मिनिटे ५४.२० सेकंदात पूर्ण केले.
मुलांच्या २१ वषार्खालील गटातही महाराष्ट्राने ४ बाय ४०० मीटर्स रिलेत ब्राँझपदक मिळविले. ही शर्यत ३ मिनिटे २१.६८ सेकंदांत पार करणाºया महाराष्ट्र संघात चैतन्य होलगरे, प्रकाश गडदे, प्रसाद अहिरे, अरनॉल्ड मेंडीस यांचा समावेश होता.