भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला काल (१३ फेब्रुवारी) पासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात यजमान भारतीय संघ अतिशय मजबूत स्थितीत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या डावात ३२९ धावा उभारल्या. या प्रत्युतरात फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडची ३४ षटकात ५ बाद ७७ अशी नाजूक अवस्था झाली आहे.
भारतीय गोलंदाजांनी या डावात इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. विशेषतः अनुभवी आर अश्विनने तीन बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. यातील तिसरा बळी मिळवताना त्याने एक महत्वाचा विक्रमही केला.
हरभजनला टाकले मागे
आर अश्विनने बेन स्टोक्सला त्रिफळाचीत करत भारतातील २६६वा बळी आपल्या नावे केला. यासह भारतात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला. या यादीत त्याने माजी फिरकीपटू हरभजन सिंगला मागे टाकले. हरभजन सिंगच्या नावावर भारतात एकूण २६५ बळी आहेत.
या यादीत माजी महान लेगस्पिनर अनिल कुंबळे अव्वल स्थानी आहे. कुंबळेने भारतात खेळतांना एकूण ३५० गडी बाद केले आहेत. अश्विन आता दुसऱ्या स्थानी पोहोचल्याने हरभजन सिंग तिसऱ्या स्थानी आहे. भारताचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू कपिल देव या यादीत २१९ बळींसह चौथ्या स्थानी आहेत. या यादीतील पहिल्या पाच क्रमांकातील ते एकमेव वेगवान गोलंदाज आहेत. त्यांच्या नंतर पाचव्या स्थानी डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा आहे. त्याच्या नावे भारतात १५७ बळी आहेत.
R Ashwin overtakes Harbhajan Singh to become the second-highest wicket-taker in Tests in India. #INDvENG pic.twitter.com/9iQqlDgJVB
— Wisden India (@WisdenIndia) February 14, 2021
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास यजमान भारत अतिशय मजबूत स्थितीत आहे. प्रथम फलंदाजी करतांना भारताने ३२९ धावा उभारल्या. आणि त्यानंतर फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांवर फास आवळला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या धावसंख्येच्या प्रत्युतरात इंग्लंडच्या ३७ षटकात ५ बाद ८२ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
INDvsENG 2nd Test Live : आर अश्विनने केली बेन स्टोक्सची दांडी गुल, २४ षटकात इंग्लंडचा अर्धा संघ माघारी; भारत २७० धावांनी आघाडीवर
कमालच! इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताला दिली नाही एकही अवांतर धाव, मोडला तब्बल ६६ वर्षे जुना विक्रम