भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका खेळतो आहे. या मालिकेतील दोन सामने झाले असून तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. या संपूर्ण मालिकेत भारताचा फिरकीपटू आर अश्विनने लक्षणीय यश मिळवले आहे. विशेषतः त्याने ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव स्मिथला मालिकेत आत्तापर्यंत चार वेळा बाद केले आहे. मात्र या कसोटीत स्मिथने शतक झळकवत या द्वंदाचे पारडे आपल्याही बाजूने झुकवले.
सिडनी कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या खेळानंतर अश्विनने या द्वंदाविषयी आपले मत मांडले. स्मिथ तसेच मार्नस लॅब्यूशेन विरोधातील हे द्वंद खास आहे, असे मत त्याने व्यक्त केले. दिवसाच्या खेळानंतरच्या आभासी पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
“दर्जेदार फलंदाज पुनरागमन करतात “
स्मिथच्या शतकाबद्दल बोलताना अश्विन म्हणाला, “दर्जेदार फलंदाज नेहमीच पुनरागमन करतात. तुम्ही त्यांना वारंवार बाद करत असाल तर ते नवनवीन गेम प्लॅनसह मैदानात उतरण्याचा प्रयत्न करतात. सिडनीच्या खेळपट्टीबाबत बोलायचे झाल्यास अॅडेलड आणि मेलबर्नच्या तुलनेत इथे वेग आणि उसळी कमी होती. सिडनीची खेळपट्टी अनेक वर्षांपासून अशीच आहे. मात्र यावेळची खेळपट्टी अजूनच धीमी होती.”
स्मिथ आणि लॅब्यूशेन यांनी अवलंबलेल्या मार्गाबद्दल बोलताना तो म्हणाला, “त्या दोघांनीही बचावात्मक पवित्रा टाळण्याची उघड योजना ठरवली होती. तसेच प्रत्येक चेंडूवर फटके मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सिडनीच्या खेळपट्टीकडून गोलंदाजाना फारशी मदत मिळत नसल्याने हा प्रयत्न यशस्वीही झाला. परंतु पहिल्या डावाच्या तुलनेत मी दुसऱ्या डावात त्यांना अडचणीत आणण्यात अधिक यशस्वी ठरलो.”
दरम्यान, सामन्याचा विचार केला असता ऑस्ट्रेलियन संघाने भारताला चौथ्या डावात ४०७ धावांचे लक्ष्य दिले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसाखेर २ बाद ९८ धावांची मजल मारली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा दिवसाखेर नाबाद असून पाचव्या दिवशी भारताला सामना जिंकायचा असल्यास अथवा अनिर्णीत ठेवायचा असल्यास या दोघांवर मोठी भिस्त असेल.
महत्वाच्या बातम्या:
अरे पकडा पकडा! चेंडू हातून निसटल्यावर पठ्ठ्याने थेट पायांनी घेतला झेल, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
डच्चू देण्यास एवढं पुरेसं! ऑसी फलंदाजाचा सोपा झेल सोडल्याने विहारी टोलर्सच्या निशाण्यावर
कमालच की राव! सुरुवातीच्या पन्नास धावांसाठी खेळले ११६ चेंडू, अन् पुढच्या ३३ धावांसाठी फक्त १६