भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय कसोटी संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. नुकताच इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. याच मालिकेत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये २०० पेक्षा अधिक वेळेस डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद करणारा अश्विन हा एकमात्र गोलंदाज आहे. त्याने अनेकदा डाव्या हाताच्या फलंदाजांना अडचणीत टाकल्याचे पाहायला मिळाले आहे.
डाव्या हाताच्या फलंदाजांना अश्विनची गोलंदाजी खेळण्यास अडचणींचा सामना का करावा लागतो, याचा खुलासा अश्विनने स्वतः केला आहे. त्याने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की,” कारण मी बॅटच्या दोन्ही किनाऱ्यांना लक्ष्य करतो. मी फलंदाजाला आतल्या आणि बाहेरच्या किनाऱ्याने बाद करतो. त्यावेळी स्लीप, शॉर्ट लेग आणि सिली पाँइंटचे क्षेत्ररक्षण महत्त्वाचे असते. मला वाटते की, हेच डाव्या हाताच्या फलंदाजांना खेळणे कठीण जाते. तसेच, मी कोन बदलतो, मी खेळपट्टीवर गोलंदाजी करतो आणि यष्टीच्या जवळपास ही गोलंदाजी करतो. त्यामुळे बॅटच्या दोन्ही किनाऱ्याला आव्हान देण्यासाठी मला धार मिळते.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आम्ही विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी चांगला खेळ केला आहे. न्यूझीलंड एक उत्कृष्ट संघ आहे. त्यांच्याकडे उत्कृष्ट खेळाडू आहेत. खरे आहे की त्यांनी अंतिम सामन्यापूर्वी काही कसोटी सामने खेळले असावेत. आम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागणार आहे. आम्हाला अनुभवाचा फायदा घ्यायचा आहे आणि संधीची वाट पाहायची आहे.”
न्यूझीलंड संघात टॉम लेथम, डेवोन कॉनवे आणि हेनरी निकोल्स हे डाव्या हाताचे फलंदाज असणार आहेत. त्यामुळे अश्विनवर या फलंदाजांना बाद करण्याची जबाबदारी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विक्रमी सामन्यात अँडरसन बनला सर्वात दुर्दैवी आकडेवारीचा भाग; ‘हा’ नकोसा विक्रम झाला नावावर
डीकॉकच्या शतकानंतर रबाडाची धारदार गोलंदाजी; दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजविरुद्ध एका डावाने विजय
‘फॅब फोर’ पैकी केवळ ‘कर्णधार’ विराट कोहलीच ‘या’बाबतीत अजिंक्य