भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या उत्तम फॉर्म मध्ये आहे. नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याने भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावली. मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा काढण्याचा मानही त्याने पटकावला. आता मालिका संपल्यानंतर रोहितच्याच एका संघ सहकाऱ्याने त्याचे कौतुक करतांना रोहितने वर्ल्ड कप जिंकावा अशी आपली इच्छा असल्याचे सांगितले.
“रोहित शर्माला वर्ल्ड कप उंचावताना पाहण्याची इच्छा”
रोहित शर्माने आजवर दोन वनडे वर्ल्ड कप खेळले आहेत. २०११ साली तो सुरुवातीला संघाचा भाग होता. मात्र वर्ल्ड कप सुरु होण्याआधीच त्याला दुखापत झाल्याने त्याच्या जागी युसूफ पठाणचा संघात समावेश करण्यात आला. त्यानंतर २०१५ मध्ये आणि २०१९ मध्ये रोहितने वर्ल्ड कप खेळला होता. मात्र या दोन्हीही वर्ल्ड कपमध्ये भारताला उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे रोहितचे वर्ल्डकप विजयाचे स्वप्न अजूनही अधुरेच आहे.
आता रोहितचे हे अधुरे स्वप्न लवकर पूर्ण व्हावे अशी इच्छा त्याचा संघसहकारी आर अश्विनने व्यक्त केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विजय मिळाल्यानंतर तो बोलत होता. अश्विन म्हणाला, “रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये जी कामगिरी करतो आहे, ते पाहून कोणालाच आश्चर्य वाटणार नाही. आता माझी इच्छा आहे की त्याने वर्ल्ड कप जिंकावा.”
भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत
दरम्यान, इंग्लंडविरुद्ध मायदेशातील मालिकेत ३-१ च्या फरकाने विजय मिळवल्याने भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता १८ ते २२ जूनदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करेल.
आयसीसीने आयोजित केलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हा पहिलाच हंगाम आहे. त्यामुळे पहिल्याच हंगामाचे विजेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघ आता आतुर असेल. तसेच भारताकडून केवळ कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या आर अश्विन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यासारख्या खेळाडूंसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद वर्ल्ड कप जिंकण्यासारखेच असेल, असे विधान आर अश्विनने केले आहे. त्यामुळे अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत करण्यासाठी भारतीय संघ सर्वस्व पणाला लावेल, यात काही शंका नाही.
महत्वाच्या बातम्या:
दे घुमा के! मार्टिन गप्टिलच्या जबरा सिक्सरचा चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर, व्हिडिओ व्हायरल
४६ वर्षीय शाहिद आफ्रिदीच्या मुलीचा या पाकिस्तानी क्रिकेटरबरोबर साखरपुडा
ही आहे जसप्रीत बुमराहची वाग्दत्त वधू? स्पोर्ट्स अँकर म्हणून आहे प्रसिद्ध