शनिवारपासून (२६ डिसेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची लढत सुरु झाली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या सामन्यातून युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि फलंदाज शुबमन गिलचे कसोटी पदार्पण झाले आहे. या सामन्याची सुरुवात होण्यापुर्वी त्यांना कसोटी कॅप देत प्रोत्साहित करण्यात आले. दरम्यान अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने आपल्या वक्तव्याने सर्वांची मने जिंकली.
आर अश्विनने थोपटली सिराजची पाठ
अश्विनने आपल्या हाताने सिराजला त्याची कसोटी पदार्पणाची कॅप दिली. यावेळी काही शब्दात त्याने सिराजच्या क्रिकेट प्रवासाचा आढावा दिला. सिराजने देशांतर्गत क्रिकेटपासून ते अ दर्जाच्या भारतीय संघापर्यंत पोहोचताना अनेक कठीण अडथळ्यांचा सामना केला आहे. त्यानंतर त्याने भारतीय संघाकडून खेळण्याचा हक्क मिळवला आहे, अशा शब्दात अश्विनने सिराजची प्रशंसा केली.
अश्विन म्हणाला की, “प्रथम श्रेणीपासून ते भारत अ संघापर्यंत केलेल्या अथक परिश्रमांनतर सिराजला कसोटी कॅप मिळाली आहे. तू स्वत: तुझ्या मेहनतीने हे यश साध्य केले आहेस. तू या कसोटीत प्रत्येक पावला पावलावर आमची साथ देशील.”
बीसीसीआयने केला सिराजच्या हिम्मतीला सलाम
एवढेच नव्हे तर, सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच त्याच्या वडीलांचे निधन झाले आहे. तरीही त्याने कुटुंबापेक्षा जास्त आपल्या कर्तव्याला महत्त्व दिले. त्याच्या या हिम्मतीची दाद देत बीसीसीआयनेही त्याला सलाम केला. “त्याने वैयक्तिक शोकांतिकेचा सामना केला, प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि आता त्याला २९८वा भारतीय कसोटीपटू म्हणून नावाजण्यात येत आहे,” असे ट्विट बीसीसीआयने केले आहे.
He battled personal tragedy, fought adversity and is now rewarded with India's Test ???? no. 298. Congratulations Mohammed Siraj. Go seize the day! #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/D48TUJ4txp
— BCCI (@BCCI) December 25, 2020
मोहम्मद शमीची दुखापत पडली पथ्यावर
ऍडलेड कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या जागी सिराजला संधी देण्यात आली आहे. त्या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शमीच्या हाताला चेंडू लागला होता. पुढे त्याची दुखापत गंभीर असल्याचे कळल्याने त्याला मालिकेतून बाहेर करण्यात आले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना सिराजचा कसोटी कारकिर्दीतील पहिलाच सामना आहे. यासह तो भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा २९८वा खेळाडू ठरला आहे.
सिराजची कारकिर्द –
सिराजने कसोटी पदार्पण करण्याआधी १ वनडे आणि ३ टी२० सामने आंरराष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत. यात त्याने एकूण ३ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने प्रथम श्रेणीचे ३८ सामने खेळले असून १५२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ४७ अ दर्जाच्या सामन्यात त्याने ८१ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
गोल गिरकी घेत पुजाराने पकडला स्मिथचा अप्रतिम झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल






