अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना नुकताच पार पडला. या सामन्यात यजमानांनी फलंदाजी आणि गोलंदाजी विभागात दमदार कामगिरी करत एक डाव आणि २५ धावांनी पाहुण्यांना पराभूत केले. यासह भारताने ही कसोटी मालिकाही ३-१ ने खिशात घातली आहे. दरम्यान सामन्यातील तिसऱ्या आणि इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताचा फिरकीपटू आर अश्विनने मोठा विक्रम केला आहे.
पहिल्या डावात रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या मोठ्या आकडी खेळीच्या जोरावर भारताने १६० धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. अश्विनने ४.४ षटकात इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्राउलेला झेलबाद करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. लगेचच पुढील चेंडूवर त्याने जॉनी बेयरस्टोला शून्यावर बाद केले.
पुढे इंग्लंडचा कर्णधार जो रुटही अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात फसला. तो ७२ चेंडूत ३० धावांवर पायचित झाला. त्यानंतर अर्धशतक झळकावणाऱ्या डॅनियल लॉरेन्सला त्याने तंबूत धाडले. शेवटी जॅक लीचला अजिंक्य रहाणेच्या हातून झेलबाद करत डावातील आपली पाचवी विकेट घेतली.
अशाप्रकारे विकेट्सचा पंचक घेत अश्विनने दिग्गज गोलंदाजांच्या मानाच्या विक्रमाच्या यादीत स्थान मिळवले आहे. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील तब्बल ३० वा पंचक होता. यासह कसोटीत सर्वाधिक विकेट्सचा पंचक घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आला आहे.
श्रीलंकेचा माजी गोलंदाज मुथैय्या मुरलीधरन याबाबतीत अव्वलस्थानी आहे. त्याने सर्वाधिक ६७ वेळा हा कारनामा केला आहे. तर ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न ३६ दुसऱ्या आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू रिचर्ड हेडली ३६ पंचकसह तिसऱ्या स्थानावर आहेत. अलिन कुंबळे आणि रंगना हेराथ हे संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.
कसोटीत सर्वाधिक वेळा विकेट्सचा पंचक घेणारे गोलंदाज
६७ वेळा- मुथैय्या मुरलीधरन
३७ वेळा- शेन वॉर्न
३६ वेळा- रिचर्ड हेडली
३४ वेळा- अनिल कुंबळे
३४ वेळा- रंगना हेराथ
३० वेळा- आर अश्विन
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीप: भारताचं फायनलचं तिकीट पक्क! लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्ध करणार दोन हात
Video: कॅचमास्टर अजिंक्य! अवघ्या काही इंचांनी चेंडू मैदानाला लागू न देता पकडला भन्नाट झेल