कोणत्याही क्रीडा प्रकारात खेळाडूंना मैदानावर उतरण्याची संधी हवी असते. क्रिकेटमध्येही सर्व खेळाडू अधिकाधिक सामने खेळण्याची इच्छा बाळगतात. मात्र, संघ व्यवस्थापनाला केवळ संघ हितासाठी संघातून बाहेर करण्याची मागणी करणारे खेळाडू दुर्मिळ असतील. त्यापैकीच एक खेळाडू भारताचा कसोटीपटू हनुमा विहारी आहे. भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी २०१९ मधील एका घटनेची आठवण सांगितली आहे. ज्यावेळी स्वतः विहारीने आपल्याला संघातून बाहेर करण्याची मागणी केली होती.
काय म्हणाले श्रीधर?
एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना श्रीधर म्हणाले,
“मला आठवत आहे की, वर्ष २०१९ मधील विशाखापट्टणम कसोटीदरम्यान हनुमा विहारी माझ्याकडे आला. तो म्हणाला की, सर मला या कसोटी सामन्यात आणि पुढील कसोटी सामन्यात खेळवू नका. आपण एका अतिरिक्त गोलंदाजासह खेळले पाहिजे. कारण, आपला संघ ज्या प्रकारची फलंदाजी करत आहे ते लक्षात घेता आपल्याला ६ स्पेशालिस्ट फलंदाजांची गरज नाही.” श्रीधर यांनी केलेला हा खुलासा आश्चर्यचकीत करणारा आहे. कारण, विहारी याला भारतीय संघात नियमित संधी मिळत नाही. प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास त्याला संधी मिळते. अशा परिस्थितीत त्याने स्वतःहून संघातून बाहेर बसण्याची मागणी करणे निश्चितच त्याच्याबद्दल आदर वाढवणारे ठरते.
अशी राहिली आहे कारकीर्द
हनुमा विहारी हा भारतासाठी केवळ कसोटी सामने खेळतो. तो सातत्याने संघासोबत असतो. मात्र, त्याला मर्यादित संधी मिळते. त्याने आत्तापर्यंत भारतीय संघासाठी १३ कसोटीत ३४.२० च्या सरासरीने ६८४ धावा केल्या असून, यामध्ये १ शतक व चार अर्धशतके सामील आहेत. विदेशी खेळपट्ट्यांवर तो नेहमीच शानदार कामगिरी करताना दिसतो. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना भारतीय संघातून वगळल्यानंतर विहारी नियमितपणे संघाचा भाग असू शकतो.
महत्वाच्या बातम्या-