चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर ८८ षटकात ६ बाद ३०० धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचे उपकर्णधार अजिंक्य रहाणे पत्रकारांना सामोरा गेला.
रहाणेने सांगितले यशाचे रहस्य
चेन्नई येथे शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) सुरु झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी आपल्या नावे केला. सलामीवीर रोहित शर्माने १६१ धावांची विक्रमी खेळी केली. तर, उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ६७ धावांचे योगदान दिले. दोन्ही मुंबईकरांनी चौथ्या गड्यासाठी १६२ धावांची भागीदारी करून भारताला सुस्थितीत आणण्याचे काम केले.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अर्धशतकी खेळी करणारा अजिंक्य रहाणे पत्रकारांना सामोरे गेला. त्याने आपल्या फलंदाजीच्या यशाचे रहस्य सांगताना म्हटले, “खेळपट्टी पाहून आम्हाला समजले होते की चेंडू पहिल्या दिवसापासून वळणार आहे. नाणेफेक जिंकणे आमच्या फायद्याचे ठरले. रोहितने मला सांगितले, सकारात्मक राहून फलंदाजी करायला हवी. मी त्याच प्रकारे फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. या खेळपट्टीवर पदलालित्यदेखील तितकेच महत्त्वाचे होते.”
रहाणेने आपल्या फलंदाजीच्या रणनीतीविषयी बोलताना म्हटले, “आम्ही सामन्याआधीच स्वीपचे फटके खेळण्याविषयी रणनिती तयार केली होती. त्याचा वापरा आम्ही सामन्यादरम्यान फलंदाजी करताना केला आणि आम्हाला यश मिळाले. पहिले २०-३० चेंडू खेळून काढणे महत्त्वाचे होते.”
दुसऱ्या सामन्यात भारत सुस्थितीत
चेन्नई येथे सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान भारतीय संघ सुस्थितीत आला आहे. शुबमन गिल शून्यावर बाद झाल्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा व रोहित शर्मा यांनी दुसऱ्या गड्यासाठी ८५ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुजारा व कोहली पाठोपाठ बाद झाल्याने इंग्लंडने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.
रोहित शर्मा व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या गड्यासाठी १६२ धावांची भागीदारी केली. रोहितने वैयक्तिक १६१ तर रहाणेने ६७ धावांची खेळी साकारली. अखेरच्या सत्रात भारताचे तीन गडी बाद झाल्याने, दिवसाखेर भारताची धावसंख्या ६ बाद ३०० अशी झाली आहे. यष्टिरक्षक रिषभ पंत व पहिला कसोटी सामना खेळणारा अक्षर पटेल अनुक्रमे ३३ आणि ५ धावा काढून नाबाद आहेत. इंग्लंडकडून जॅक लिच व मोईन अली यांनी प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले.
महत्त्वाच्या बातम्या –
नयन मोंगिया आणि मनोज प्रभाकरची ‘ती’ कुविख्यात भागीदारी
बांगलादेश वि वेस्ट इंडीज : दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचे पारडे जड, कॉर्नवॉलचे बळींचे पंचक
श्रीलंकन क्रिकेटपटू कुशल मेंडिस अडकला विवाहबंधनात, संघ सहकाऱ्याने फोटो शेअर करत दिली माहिती