भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेता राहुल आवारे याची पुणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याचीदेखील दोन वर्षांपूर्वी पुणे ग्रामीण उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली होती. दोन नामांकित मल्लांना नोकरीची पहिली संधी देण्याचे भाग्य पुणे ग्रामीण पोलीस विभागाला मिळाले आहे.
नाशिक येथे पूर्ण केले पोलीस प्रशिक्षण
भारताकडून २०१६ रियो ऑलिम्पिक खेळलेल्या राहुल आवारेने आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. २०१८ गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्याला पोलीस उपअधीक्षक दर्जाची नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर, राहुलने एक वर्ष नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीत प्रशिक्षण घेतले. आता त्याची पहिलीच नियुक्ती त्याची कर्मभूमी असणाऱ्या पुणे जिल्ह्यात झाली आहे.
पुण्यात शिकले आहेत कुस्तीचे डावपेच
राहुलने पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत कुस्तीचे डावपेच शिकले आहेत. ५७ किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती खेळणाऱ्या राहुलने आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय पदके आपल्या नावे केली आहेत. २००८ मध्ये पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडास्पर्धेत देखील त्याने सुवर्णपदक पटकावले होते.
प्रतिकूल परिस्थितीतून घेतली भरारी
राहुलचे वडील बाळासाहेब आवारे देखील राज्यस्तरीय कुस्तीपटू होते. बीड जिल्ह्यातील पाथरी या त्यांच्या जन्मगावी कुस्ती प्रशिक्षणाच्या जास्त सुविधा नसल्याने बाळासाहेब यांनी राहुलला पुणे येथे प्रशिक्षणासाठी पाठवले. पुणे येथे राहुलने माजी ऑलिम्पियन आणि ‘रुस्तम-ए-हिंद’ मल्ल दिवंगत हरिश्चंद्र बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली २००४ मध्ये कुस्ती प्रशिक्षणला सुरुवात केली. हरिश्चंद्र मामा यांच्या निधनानंतर अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्याकडून तो मार्गदर्शन घेत आहे. राहुलचा लहान भाऊ गोकुळ हादेखील राष्ट्रीय मल्ल आहे.