ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड (INDvENG) यांच्या दरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. भारतीय संघाने उभारलेल्या 168 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या शानदार खेळाचा जोरावर भारताला 10 गड्याने पराभूत करत अंतिम फेरीत जागा मिळवली. भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर खेळाडूंसह संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. एक वर्षापूर्वी त्यांनी ही जबाबदारी सांभाळलेली. त्यांचा या विश्वचषकातील भारतीय संघासोबतचा प्रवास कसा आहे, याबाबत आपण माहिती घेऊया.
मागील वर्षी युएईत झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाला नामुष्कीरित्या विश्वचषकातून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर रवी शास्त्री यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिलेला. त्यांच्या जागी राहुल द्रविड यांची नियुक्ती केली गेलेली. या जबाबदारीसाठी त्यांना तब्बल 10 कोटी रुपये देण्यात येण्याचे ठरले. अनेक वर्षापासून असलेला भारतीय संघाचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान द्रविड यांच्यासमोर होते.
द्रविड यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मायदेशात इंग्लंड विरुद्ध कसोटी व टी20 मालिका जिंकल्या. मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी व वनडे मालिका जिंकण्यात भारतीय संघाला अपयश आले. त्याचवेळी मायदेशात श्रीलंका व वेस्ट इंडीजला भारतीय संघाने मात दिली. इंग्लंड दौऱ्यावर एकमेव कसोटीत भारत पराभूत झाला. परंतु, मर्यादित षटकांच्या मालिकेत भारतीय संघाला यश मिळाले. आशिया चषकात भारतीय संघाला पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र होऊ शकला नाही. त्यानंतर आता टी20 विश्वचषकातही भारताला अपेक्षित यश मिळाले नाही.
द्रविड यांना या पदावरून हटवण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. त्यांनी भारताच्या युवा खेळाडूंसह केलेल्या मेहनतीमुळे त्यांना पुढील वर्षी भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकापर्यंत आपल्या पदावर कायम ठेवले जाऊ शकते. त्या ठिकाणी देखील भारतीय संघाला यश न मिळाल्यास द्रविड यांचा पत्ता कट होऊ शकतो.
(Rahul Dravid Not Winning Any Major Trohy As Coach In One Year)