भारतीय संघाचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने माजी कर्णधार एमएस धोनीपाठोपाठ शनिवारी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर त्यांच्याबद्दल सर्वच क्षेत्रांतून अनेक दिग्गजांनी आपापली मते व्यक्त केली. यामध्ये ‘द वॉल’ राहुल द्रविडचाही समावेश आहे.
द्रविडने रैनाला ‘संघातील शानदार खेळाडू’ सांगत म्हटले की, जर रैनाला वरच्या फळीत खेळण्याची संधी मिळाली असती, तर त्याला अधिक धावा करता आल्या असत्या. द्रविडने वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या यशामधील रैनाच्या योगदानाची प्रशंसा केली आहे.
द्रविडने केली रैनाची प्रशंसा
रैनाला वनडे आणि कसोटीत ‘कॅप’ देणाऱ्या द्रविडने त्याची प्रशंसा केली आहे. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत द्रविडने म्हटले, “मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मागील दीड दशकांत भारतीय संघाला जे यश, खास क्षण मिळाले आहेत, त्यामध्ये रैनाने मोठी भूमिका निभावली आहे. मला वाटते की, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचे शानदार योगदान राहिले आहे.”
द्रविड पुढे म्हणाला, “तो विश्वविजेता आणि चॅम्पियन्स ट्रॉफीविजेता खेळाडू आहे. त्याने मैदानावर चांगले योगदान दिले आहे. ज्याप्रकारे त्याने क्षेत्ररक्षणाचा स्तर उंचावला, त्यामध्ये त्याची ऊर्जा, त्याचा उत्साह कमाल होता.”
रैनाने प्रत्येक कठीण काम केले- द्रविड
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख द्रविडने म्हटले, “एक गोष्ट जी आम्ही नेहमीच अनुभवली, ती म्हणजे रैनाने प्रत्येक कठीण काम केले. आपल्या कारकिर्दीत अधिक काळ त्याने खालच्या फळीत फलंदाजी केली, कठीण ठिकाणी क्षेत्ररक्षणही केले. काही चांगली षटके टाकली आणि नेहमी संघाला खूप काही दिले. संघातील शानदार व्यक्ती, ज्याने नेहमीच आपले सर्वोत्तम योगदान दिले. तो खेळात खूप ऊर्जा घेऊन आला आणि खूप कौशल्यपूर्ण फलंदाज होता.”
रैना अनोखा फलंदाज होता- द्रविड
द्रविडने म्हटले की, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर रैनाने वरच्या फळीत फलंदाजी केली असती, तर त्याची आकडेवारी आणखी चांगली असती. जसे की त्याला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना यश मिळाले आहे. आयपीएलसाठी तो एक अभूतपूर्व खेळाडू आहे.”
रैनाने आयपीएलमध्ये १९३ सामने खेळताना ३३.३४ च्या सरासरीने ५३६८ धावा कुटल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि ३८ अर्धशतकेही ठोकली आहेत. या धावांसह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर विराट कोहली पहिल्या क्रमांकावर असून त्याने १७७ सामन्यात ३७.८४ च्या सरासरीने ५४१२ धावा केल्या आहेत.
द्रविड पुढे म्हणाला की, “मला वाटते की कसोटी पदार्पणात शतक ठोकल्यानंतर तो या क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी करू शकला नाही. परंतु वनडे क्रिकेटमध्ये त्याने शानदार योगदान दिले. तो त्या भारतीय संघाचा भाग राहिला आहे, ज्याने मागील दीड शतकांमध्ये चांगले यश प्राप्त केले आहे.”
भारतीय संघाचा माजी कर्णधार द्रविडने म्हटले की, रैनाने ज्यूनियर क्रिकेट दरम्यानच आपली प्रतिभा सर्वांना दाखवून दिली होती. रैनाने काही काळासाठी भारतीय संघाचे नेतृत्वही केले होते. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका जिंकली होती तसेच झिंबाब्वेविरुद्ध टी२० मालिकाही जिंकली होती.
रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना आतापर्यंत १८ कसोटी सामने, २२६ वनडे सामने आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत २६.४८ च्या सरासरीने ७६८ धावा केल्या आहेत. वनडेत त्याने ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त टी२०त त्याने २९.१८ च्या सरासरीने १६०५ धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ शतके ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-राशिद खानने असा काही षटकार मारला की सर्वजण पहातच राहिले!
-सीपीएल २०२० ड्रीम ११ : गयाना अमेझॉन वॉरियर्स विरुद्ध सेंट किट्स नेव्हीस पॅट्रीयॉट्स
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: या ३ खेळाडूंची मुंबई इंडियन्सला भासू शकते उणीव
-धोनी-रैनानंतर ‘हे’ ५ भारतीय खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करु शकतात अलविदा
-‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ५ असे निर्णय, ज्याचा झाला टीम इंडियाला मोठा फायदा