वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने चौथ्या दिवशी ३७२ धावांनी जिंकला आहे. दरम्यान या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (५ डिसेंबर) भारतीय कर्णधार विराट कोहली कॅमेरामनची फिरकी घेताना दिसून आला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानात असताना आपल्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखला जातो. परंतु, मैदानाबाहेर असताना तो अनेकदा मस्ती करताना दिसून आला आहे. असाच काहीसा प्रकार दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (५ डिसेंबर) देखील पाहायला मिळाला.
तर झाले असे की, भारतीय संघाचा दुसरा डाव सुरू असताना अक्षर पटेल आणि जयंत यादव फलंदाजी करत होते. त्यावेळी भारतीय संघ डाव घोषित करणार होता. त्यामुळे कॅमेरामनने कॅमेरा ड्रेसिंग रूममध्ये असलेल्या विराट कोहलीकडे नेला. त्यावेळी विराट कोहलीने डाव घोषित करण्यासाठी हातवर केला. अनेकांना वाटू लागले होते की, आता हा डाव घोषित होणार. परंतु, इतक्यात विराटने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्यानंतर विराट कोहलीला हसू आवरत नव्हते. विराट कोहलीला देखील जाणवले असेल की, त्याला कॅमेरामनने पाहिलं आहे.
पहिल्या डावात भारतीय संघाने उभारला ३२५ धावांचा डोंगर
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२५ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून मयांक अगरवालने सर्वाधिक १५० धावांची खेळी केली होती, तर अक्षर पटेलने ५२ आणि शुबमन गिलने ४४ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली होती. तर न्यूझीलंड संघाकडून एकट्या एजाज पटेलने १० गडी बाद केले होते.
भारतीय गोलंदाजी समोर किवी फलंदाजांनी टाकल्या नांग्या
भारतीय संघाने दिलेल्या ३२५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंड संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ६२ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने सर्वाधिक १७ धावा केल्या, तर टॉम लॅथमने १० धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आर अश्विनने सर्वाधिक ४ तर मोहम्मद सिराजने ३ गडी बाद केले.
King’s Sarcasm#INDvzNZ #ViratKohli pic.twitter.com/SAhKKpwqWI
— Piyush Garg (@piyushgaarg) December 5, 2021
भारतीय संघाचा विजय
भारतीय संघातील फलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मयांक अगरवालने ६२ धावांची खेळी केली, तर शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी ४७ धावांची खेळी केली. भारतीय संघाने दुसरा डाव ७ बाद २७६ धावांवर घोषित केला. न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यासाठी ५४० धावांची आवश्यकता होती.
मात्र, न्यूझीलंडला ५६.३ षटकांत सर्वबाद १६७ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून डॅरिल मिशेलने ६० धावांची खेळी केली. तसेच हेन्री निकोल्सने ४४ धावा केल्या. मात्र, अन्य कोणालाही खास काही करता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा क्षेत्ररक्षण करताना एजाजचा स्टँडमध्ये बसलेल्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद, व्हिडिओ व्हायरल
‘फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी अगरवालच्या फलंदाजीतून घेतला धडा’, न्यूझीलंडच्या अर्धशतकवीराचा खुलासा
‘विराटसने’चा वानखेडेवर पराक्रम! न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव करत ‘या’ यादीत गाठले अव्वल स्थान