भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नुकत्याच आपल्या शालेय क्रिकेटमधील पहिल्या शतकाच्या आठवणी जाग्या केल्या. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी या आठवणींना उजाळा दिला. शालेय क्रिकेटमध्ये शतक झळकावले तेव्हा त्याचे नाव पहिल्यांदा वृत्तपत्रात आले होते, असे द्रविड यांनी सांगितले. राहुल द्रविड यांनी व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शालेय क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या होत्या. सेंट जोसेफ बॉईज हायस्कूल, कर्नाटककडून खेळताना त्याने चमकदार कामगिरी केलेली.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राच्या पॉडकास्टवरील संभाषणादरम्यान ते म्हणाले,
‘शालेय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावल्यानंतर माझे नाव वृत्तपत्रात आले. मात्र, वृत्तपत्राच्या संपादकाला माझ्या आडनावाविषयी काहीतरी शंका असावी. त्याने स्पेलिंग मिस्टेक समजून, द्रविड ऐवजी डेव्हिड असे नाव लिहिले. कारण, बेंगलोरमध्ये डेव्हिड हे नाव अत्यंत सर्रास वापरले जाते. माझ्या मते, माझ्यासाठी हा एक मोठा धडा होता. शालेय क्रिकेटमध्ये शतक झळकावून मी खूप आनंदी असलो तरीही लोकांना माझ्याबद्दल माहिती नव्हते. लोकांना माझे नावही माहीत नव्हते. माझे खरे नाव संपादकाला माहीत असते तर, त्याने अशी चूक केली नसती.”
याच पॉडकास्टमध्ये द्रविड यांनी अभिनवच्या ऑलिम्पिक सुवर्णामूळे आपल्याला प्रेरणा मिळाली हे देखील सांगितले. वैयक्तिक खेळात ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा बिंद्रा पहिला भारतीय आहे. त्याने २००८ बीजिंग ऑलिंपिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात हे सुवर्ण जिंकलेले.
राहुल द्रविड यांनी कर्नाटकसाठी अंडर-१५, अंडर-१७ आणि अंडर-१९ स्तरावर क्रिकेट खेळले. त्यानंतर ते संघासाठी रणजी ट्रॉफीही खेळले. त्यांनी १९९६ मध्ये भारतासाठी पदार्पण केले. द्रविड यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २४ हजारांहून अधिक धावा केल्या. या कालावधीत त्यांनी एकूण ४८ शतके झळकावली. सध्या ते भारतीय राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
टी-२० विश्वचषक २००७ गाजवणारा भारताचा हिरो, आता ‘या’ स्पर्धेतही चमकणार?
‘त्याच्याकडे खूप प्रतिभा आहे’, ‘या’ भारतीय दिग्गजाने गायले हुड्डाचे गोडवे
भारताचा आणखी एक गोलंदाज काऊंटी क्रिकेटमध्ये घालतोय धुमाकूळ!