शनिवारी (५ फेब्रुवारी) १९ वर्षाखालील विश्वचषकाचा (U19 WORLD CUP FINAL) अंतिम सामना अँटिगवामध्ये खेळला गेला. भारताचा १९ वर्षाखालील संघ आणि इंग्लंडचा १९ वर्षाखालील संघ स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आमने सामने होते. भारतीय संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच वर्चस्व निर्माण केले होते. भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन करून इंग्लंडचे कंबरडे मोडले. भारताचा युवा अष्टपैलू राज बावा (raj bawa) याचे सामन्याती प्रदर्शन खरोखर कौतुकास्पद होते. या सामन्यानंतर बावाने माजी दिग्गज कपिल देव (Kapil Dev) यांची बरोबरी केली आहे.
राज बावा यावर्षीच्या या १९ वर्षाखालील विश्वचषकात भारतासाठी उत्कृष्ट प्रदर्शन करणार खेळाडू ठरला आहे. त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात चार विकेट्स घेतल्या. तर युगांडाविरुद्धच्या सामन्यात तब्बल १६२ धावांची खेळी केली होती. युगांडाविरुद्ध त्याने केलेली खेळी १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या इतिहासात एका भारतीय खेळाडूकडून केली गेलेली सर्वात मोठी खेळी ठरली आहे. त्यानंतर आता अंतिम सामन्यात त्याने पाच महत्वाच्या विकेट्स घेतल्या आणि इंग्लंड संघाला अवघ्या १८९ धावांवर सर्वबाद केले.
१९ वर्षाखालील विश्वचषकातील राज बावाचे हे प्रदर्शन, कपिल देवने १९८३ साली केलेल्या विश्वचषाकीत प्रदर्शनाशी बरोबरी साधणारे आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने १९८३ साली इतिहासातील पहिला विश्वचषक जिंकला होता. कर्णधार कपिल देव यांनी त्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्धच्या एका सामन्यात वैयक्तिक १७५ धावांची खेळी केली होती. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या होत्या. एका आयसीसी स्पर्धेत १५० धावांपेक्षा मोठी खेळी आणि सोबतच ५ विकेट्स घेण्याची किमया साधणारे कपिल देव पहिले भारतीय खेळाडू होते. आता राज बावा या यादीतील दुसरा खेळाडू बनला आहे.
दरम्यान, १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाज राज बावा आणि रवी कुमार यांनी इंग्लंडचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. राज बावाने या सामन्यात ९,५ षटकात ३१ धावा खर्च केल्या आणि ५ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तर रवी कुमारने टाकलेल्या ९ षटकात ३४ धावा खर्च करून चार विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त कौशल तांबेला एक विकेट मिळाली. यासाठी तांबेने पाच षटके टाकली आणि २९ धावा दिल्या.
महत्वाच्या बातम्या –
बंगलोर एफसीचे दमदार पुनरागमन; रोखली जमशेदपूर एफसीची विजयी घोडदौड
“हार्दिकला संधी देऊन निवडकर्त्यांनी दया दाखवलेली”