भारतीय क्रिकेटमधील सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेला गुरुवारपासून (१७ फेब्रुवारी) सुरुवात झाली. तब्बल ७०६ दिवसानंतर या स्पर्धेतील सामने खेळले जात आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अनेक युवा खेळाडूंनी दिवस गाजवला. नुकताच भारतीय संघाला एकोणीस वर्षाखालील मुलांचा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार यश धूल (Yash Dhull) याने दिल्लीसाठी तमिळनाडू संघाविरुद्ध रणजी पदार्पण केले. पहिल्याच दिवशी त्याने शानदार शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच वेळी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या राज बावाने (Raj Bawa) चंदीगडसाठी पदार्पण करताना एक शानदार कामगिरी करून दाखवली.
राजने केला अनोखा पराक्रम
भारताच्या विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेल्य राज बावा याने रणजी ट्रॉफी २०२२ च्या पहिल्या सामन्यातच हैदराबादविरुद्ध प्रथमश्रेणी पदार्पण केले. त्याला सामन्यातील पंधरावे षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याने आपल्या पहिल्या चेंडूवर हैदराबाद संघाचा सलामीवीर तन्मय अग्रवाल याला बाद करत कारकिर्दीची झोकात सुरुवात केली. विश्वचषकातील आपला शानदार फॉर्म त्याने या सामन्यातही कायम राखला. राजने विश्वचषकात युगांडाविरुद्ध १६५ धावांची खेळी केली होती. तर, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाच बळी मिळविले होते.
या दिग्गजांच्या यादीत झाला समाविष्ट
यापूर्वी अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या प्रथमश्रेणी पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यातील पहिल्या चेंडूवर बळी मिळवण्याची कामगिरी केली होती. माजी भारतीय क्रिकेटपटू उदय सिंग यांनी सौराष्ट्रासाठी १९६५ मध्ये, रवींद्र चढ्ढा यांनी १९६७ मध्ये पंजाबसाठी, राजू मुखर्जी यांनी १९७३ मध्ये बंगालसाठी तर टीए शेखर यांनी १९८० मध्ये तमिळनाडूसाठी अशी कामगिरी करून दाखवली होती. अखेरच्या रणजी ट्रॉफी हंगामात राजस्थानच्या यश कोठारी याने २०२० मध्ये आंध्रप्रदेश विरुद्ध ही कामगिरी करून दाखवली होती.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर हिटमॅनने व्यक्त केली नाराजी, म्हणाला.. (mahasports.in)
आरसीबीचा हात धरल्यानंतर दिनेश कार्तिकची केकेआरसीठी भावनिक पोस्ट, वाचा सविस्तर (mahasports.in)
Video: विराट जरा जपून…! पहिल्या टी२०त माजी कर्णधाराची घसरली जीभ, वापरले अभद्र शब्द (mahasports.in)