इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला कोरोनामुळे स्थगित करण्यात आले होते. ज्यानंतर आता हा उर्वरित हंगाम १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर आता एक नवी बातमी समोर येत आहे.
आयपीएलचा संघ राजस्थान रॉयल्सने आपल्या संघातील दोन खेळाडू यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांना मुक्त केले आहे. यामागचे कारण असे की, मुंबईचा देशांतर्गत संघ मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी ओमानच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौर्यात मुंबई आणि ओमान यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका तसेच, ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका देखील खेळविण्यात येणार आहे.
शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल दोन्ही खेळाडू मुंबई संघातून देशांतर्गत क्रिकेट खेळतात. मुंबईने या दौऱ्यासाठी आपला १४ सदस्यीय संघ घोषित केला. ज्यात या दोघांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबई संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष सलील अंकोलाने मुबईचे वरिष्ठ खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये व्यस्त असल्याकारणाने राजस्थान रॉयल्सला या दोन खेळाडूंना मुक्त करण्याची मागणी केली होती.
टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना अंकोला म्हणाले, “मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) राजस्थान रॉयल्स संघाला या दोन खेळाडूंना ओमन दौऱ्यासाठी मुक्त करण्याची मागणी केली होती. ज्यानंतर ही मागणी मान्य करत राजस्थान रॉयल्स संघाने या दोन खेळाडूंना मुक्त करण्याची परवानगी दिली. ओमान दौऱ्यानंतर हे दोन खेळाडू तेथूनच उर्वरित आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्स संघात सामील होणार आहेत.”
दरम्यान, ओमानला रवाना होणाऱ्या या संघातील सर्व खेळाडू मस्कतमध्ये एका दिवसासाठी विलगीकरणात राहणार आहेत. ज्यानंतर ओमान आणि मुंबई यांच्यात २२-२६ ऑगस्ट दरम्यान ३ टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या दरम्यान ३ एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहे.
“मागील एक महिन्यापासून मुंबईचा संघ या दौऱ्यासाठी सराव करत आहे. यादरम्यान भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचे देखील या संघातील खेळाडूंना मार्गदर्शन लाभले होते. ज्यामुळे मुंबई संघासाठी देशांतर्गत सत्रापूर्वी ओमान विरुद्धची ही मालिका खूप महत्त्वपूर्ण राहील,” असेही अंकोला म्हणाले.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, “ही आमच्यासाठी चांगली बाब आहे की, ओमानने आम्हाला या मालिकेसाठी आमंत्रित केले. मुंबईत होणाऱ्या सततच्या पावसामुळे मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारचे क्रिकेटचे आयोजन करण्यात व्यत्यय येतो. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंसाठी हा दौरा एक चांगला सराव म्हणून देखील उपयुक्त ठरू शकतो. ज्यामुळे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या सरावासाठी आम्हाला चांगली संधी मिळू शकते.”
हा दौरा झाल्यानंतर शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल तेथूनच यूएईमध्ये होणाऱ्या उर्वरित आयपीएलसाठी संघात सामील होणार आहेत. त्या दृष्टीने या दोन खेळाडूंसाठी ओमानचा हा दौरा महत्त्वपूर्ण राहू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
–भारीच! ऐतिहासिक विजयानंतर विराटसेनेला लॉर्ड्स ग्राउंडकडूनही मिळाल्या खास शुभेच्छा
–… आणि विराटचा ‘तो’ निर्णय ठरला ऐतिहासिक
–“तमाम भारतीयांसाठी आमच्याकडून १५ ऑगस्टची सर्वोत्तम भेट”, लॉर्ड्सवरील विजयानंतर विराटची मन जिंकणारी प्रतिक्रिया






