आयपीएल २०२२ स्पर्धेचा थरार सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत काही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. पुढील हंगामात लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. तर स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा मेगा लिलावदेखील आयोजित करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघांना ३० नोव्हेंबरपर्यंत आपल्या संघातील ४ खेळाडूंना रिटेन करण्याची संधी देण्यात आली आहे. आता सर्व संघ आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करणार आहेत. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाने रिटेन केलेल्या आपल्या पहिल्या खेळाडूचे नाव जाहीर केले आहे.
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स संघासाठी रिटेन करण्यात आलेला पहिला खेळाडू ठरला आहे. पुढील ३ वर्षांसाठी त्याला राजस्थान रॉयल्स संघाने रिटेन केले आहे. एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाच्या माहितीनुसार, संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधार पदावर कायम राहणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२१ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघ ७ व्या स्थानी होता.
राजस्थान रॉयल्स सॅमसनसह आणखी ३ खेळाडूंना रिटेन करणार आहे.राजस्थान रॉयल्स संघाने, संजू सॅमसनला १४ कोटींच्या करारासह रिटेन केले आहे.तसेच इतर खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स इंग्लंडच्या खेळाडूंना रिटेन करू शकतो. ज्यामध्ये जोस बटलर, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
लिलावाच्या नियमांनुसार, जर एखाद्या फ्रँचायझीने चार खेळाडूंना रिटेन केले तर पहिल्या खेळाडूचा करार १६ कोटींचा असायला हवा. तरीदेखील संजू सॅमसनने केवळ १४ कोटींमध्ये संघाकडून खेळण्यास होकार दिला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने चार खेळाडूंना रिटेन केल्यास ते ४५ कोटींच्या पर्ससह लिलावात जातील.आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी ३० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.