नागपूर। उद्यापासून(3 फेब्रुवारी) विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र संघात रणजी ट्रॉफी 2018-19 चा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.
या सामन्यात सौराष्ट्रकडून चेतेश्वर पुजारा, जयदेव उनाडकट असे तर विदर्भाकडून वासिम जाफर, उमेश यादव असे स्टार खेळाडू खेळणार असल्याने या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
पुजारा आणि कर्णधार उनाडकट या दोघांनीही कर्नाटक विरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीत चांगली कामगिरी केली होती. पुजाराने या सामन्यात दुसऱ्या डावात नाबाद 131 धावा केल्या होत्या. तसेच शेल्डन जॅक्सन बरोबर 214 धावांची भागीदारी रचत सौराष्ट्राला विजय मिळवून दिला होता. तर उनाडकटने या सामन्यात 7 विकेट्स घेतल्या होत्या.
त्याचबरोबर विदर्भाकडून उमेश यादवने केरळ विरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. त्याने या सामन्यात 12 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच विदर्भाकडून 40 वर्षीय जाफरने चांगली कामगिरी करताना एका द्विशतकासह चार शतके केली आहेत. तो यावर्षीच्या मोसमातील सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने 1003 धावा केल्या आहेत.
या खेळाडूंशिवाय सौराष्ट्रकडे हार्विक देसाई आणि अर्पित वासवडा सारखे युवा क्रिकेटपटू आहेत. तसेच गोलंदाजीमध्ये धर्मेंद्रसिंग जडेजा देखील आहे. तर विदर्भ संघात कर्णधार फेज फैजल आणि अक्षय वाडकर असे फलंदाज आणि रजनीश गुरबानी, यश ठाकुर, सनिकेत बिंगेवर आणि आदित्य ठाकरे असे गोलंदाज आहेत.
विदर्भाने मागील वर्षी पहिल्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. तर सौराष्ट्रने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे विदर्भ सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवणार की सौराष्ट्र हे विजेतेपद मिळवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–या कारणामुळे भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे वेळापत्रक बदलणार
–न्यूझीलंडचा द्विशतकवीर पाचव्या वन-डेला मुकण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
–एमएस धोनीला बाद केल्याशिवाय सामना जिंकणे कठीण, न्यूझीलंडच्या खेळाडूचे मोठे वक्तव्य