देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाची मानली जाणारी रणजी ट्रॉफी (ranji trophy 2022) स्पर्धा गुरुवारी (१७ फेब्रुवारी) सुरू झाला. भारताच्या युवा खेळाडूंसोबतच काही दिग्गजांसाठी ही स्पर्धा महत्वाची असणार आहे. अजिंक्य राहणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हे असे खेळाडू आहेत, ज्यांना स्पर्धेत चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यातील पहिल्या सामन्यात रहाणे आणि पुजारा आमने सामने होते. पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली आणि भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदारीही सिद्ध केली.
मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यातील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु संघाची सुरुवात निराशाजनक राहिली. मुंबईने वरच्या फळीतील तीन महत्वाच्या विकेट्स अवघ्या ४४ धावांवर गमावल्या. अशात जेव्हा संघाला एका मोठ्या भागीदारीची गरज होती, तेव्हा अजिंक्य रहाणे आणि सरफराज खान यांनी ही जबाबदारी चोख पार पाडली. पहिल्या दिवसचा खेळ संपेपर्यंत मुंबईने ३ विकेट्सच्या नुकसानावर २६३ धावा केल्या.
भारताच्या कसोटी संघाचा माजी उपकर्णधार आणि मुंबईचा महत्वाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने त्याच्या अनुभवाचा योग्य वापर केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रहाणेने २५० चेंडूत १०८ धावा केल्या आहेत. तर सरफराज खानने २१९ चेंडूत १२१ धावा काढल्या. हे दोन्ही फलंदाज सध्या खेळपट्टीवर कायम आहेत. रहाणेच्या या खेळीमध्ये १४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. रहाणेसाठी हे प्रथमश्रेणी कारकिर्दीतील ३६ वे शतक आहे.
या शतकी खेळीसोबतच रहाणेने भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांपुढे संधी मिळवण्यासाठी पुन्हा एकदा दावेदारी सिद्ध केली आहे. पुढच्या महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्या मायदेशातील कसोटी मालिका खेळली जाणार आहे. अशात या मालिकेत संधी मिळण्यासाठी रहाणेची खेळी महत्वाची ठरू शकते. तर दुसरीकडे चेतेश्वर पुजाराला श्रीलंकेविरुद्धच्या या आगामी मालिकेत संधी मिळवण्यासाठी रणजी ट्रॉफीत चांगले प्रदर्शन करावे लागणार आहेत. या सामन्यातही पुजाराच्या फलंदाजीवर सर्वांचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या –
पीएसएलमध्ये गायले गेले धोनीचे गुणगान! समालोचक म्हणाले, “आता तोच या खेळाडूला सुधरवेल”
रवी बिश्नोईसाठी टी२० पदार्पण राहिले खास! सामनावीर ठरल्यावर दिली मोठी प्रतिक्रिया